नाशिक - शहरातील पेठ रोडवर असलेल्या आरटीओ कार्यालयासमोर आज (शनिवार) पहाटे चार वाजेच्या सुमारास दोन ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जण जखमी झाले असून दोन जण गंभीर आहेत. त्यांना उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनकोंडी झाली होती.
दोघांची प्रकृती चिंताजनक -
नाशिक येथील आरटीओ कार्यालयासमोर नाशिकहुन बीडकडे जाणाऱ्या ट्रकची पेठहून नाशिकडे येणाऱ्या मालवाहतूक ट्रकसोबत भीषण धडक झाली. हा अपघात पहाटेच्या चार वाजेच्या सुमारास घडला. या अपघातात पाच जण जखमी झाले आहेत. बाजार समितीतील नागरिकांनी जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
परिसरात वाहतूक कोंडी
सकाळच्या वेळी शरदचंद्र पवार मार्केटवरून भाजीपाला घेऊन जाणारे शेतकऱ्यांची वाहने याच रस्त्याने येत असतात. घटनेनंतर अपघातग्रस्त ट्रक रस्त्यातच पडून असल्याामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.