नाशिक - कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी महानगरपालिकेसह महसूल, आरोग्य तसेच पोलीस प्रशासनामार्फत विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. दरम्यान नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी शहरातील दहा स्थळे निश्चित करण्यात आली आहेत. त्यावर नियंत्रण व नियमन करण्यासाठी दहा अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे आदेश महानगरपालिका उपायुक्त नितीन कापडणीस यांनी पारित केले आहेत.
निहाल नगर, कल्लू कुट्टी मैदान, सलीम नगर, अहले हादिस इदगाह, 60 फुटी रोड, अब्बास नगर चौक, गांधी नगर, गुलशेर नगर डेपो, जमहूर नगर, अजीज कल्लू स्टेडियम अशी शहरातील दहा ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. याठिकाणांहून घाऊक व्यापाऱ्यांकडून किरकोळ व्यापाऱ्यांना जीवनावश्यक वस्तू विक्रीसाठी घेता येणार आहेत.
दैनंदिन फळांच्या आवकाची आकडेवारी घेणे. या ठिकाणांवर सोशल डिस्टन्सिंगची अंमलबजावणी होणे. दररोज वितरीत होणारा माल आणि किरकोळ व्यापारी व हातगाडी चालक यांच्या संख्येचा अहवाल सादर करणे. तसेच संपूर्ण प्रक्रियेवर नियंत्रण करण्यासाठी दहा अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे कापडणीस यांनी सागितले आहे.
ही सुविधा नागरिकांच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी करण्यात आली असून नागरिकांनी प्रशासनाच्या सुचनांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे. सायंकाळी 5 वाजेनंतर कुठल्याही विक्रेत्याने दुकाने, हातगाडी सुरु राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहनही कापडणीस यांनी केले आहे.