नाशिक - सिन्नर येथील ऑक्सिजन पुरवठादार कंपनी मे. स्वस्तिक एयर हा प्लांट २०१९पासून वीजबिल देयक न भरल्याने बंद अवस्थेत होती, ही बाब आमदार बनकर यांना समजताच त्यांनी लगेच २७ एप्रिलला मुंबई गाठत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या दरबारी ही समस्या मांडली. महत्त्वाचा विषय असल्याने दोन्ही मंत्र्यांनी तत्काळ प्रशासनाला आदेश करत लागेच वीज जोडणी सुरळीत करण्यास सांगितले. आमदार बनकर मुंबईहून नाशिकला पोहचत नाही तोपर्यंत सदर कंपनीतील वीज पुरवठा सुरळीत झाला. या ऑक्सिजन प्लांटमुळे रोज 600 ऑक्सिजन टाक्या भरू शकणार आहेत.
नाशिक जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात नाशिक जिल्हा सर्वात जास्त बाधित असल्याचे आकडेवारीनुसार दिसते. तशी परिस्थिती निर्माण झाल्याने रुग्णांना आरोग्य व्यवस्था अपूर्ण पडत आहे आणि त्यात ऑक्सिजनचा तुटवडा म्हणून अनेक रुग्णालयात रुग्णांना दुसरीकडे हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
कोरोना रुग्णांना ऑक्सिजन हा सर्वात महत्त्वाचा आहे आणि हिच बाब हेरून निफाडचे आमदार दिलीप बनकर यांनी जिल्ह्याला ऑक्सिजन कुठून मिळवता येईल यासाठी प्रयत्न सुरू केले. नाशिक जिल्ह्यातीलच सिन्नर येथील ऑक्सिजन पुरवठादार कंपनी मे. स्वस्तिक एयर प्लांट ही सन २०१९पासून वीजबिल देयक न भरल्याने बंद अवस्थेत होती. ही बाब आमदार बनकर यांना समजताच त्यांनी मुंबई गाठत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या दरबारी ही समस्या मांडली. मंत्र्यांनी तत्काळ प्रशासनाला आदेश करत वीजजोडणी सुरळीत करण्यास सांगितले.
आमदार बनकर मुंबईहून नाशिकला पोहोचत नाही तोपर्यंत सदर कंपनीतील विज पुरवठा सुरळीत झाला असा फोन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा आल्याने त्यांनाच आमदार बनकर यांनी शुभारंभ करण्याचे आमंत्रण दिले व ते स्वीकारलेही. 28 एप्रिल रोजी सिन्नर येथे राजमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते स्वस्तिक एअरच्या ऑक्सिजन निर्मितीचा शुभारंभ पार पडला, मे. स्वस्तिक एयर रोज ६०० ऑक्सिजन टाक्या भरू शकते आणि या मुळे जिल्ह्यातील प्राणवायूचा तुटवडा भरून निघण्यास हातभार लागेल असा विश्वास उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी व आमदार बनकर यांनी व्यक्त केला. केवळ वीजपुरवठा खंडित असल्याने ऑक्सिजनची निर्मिती बंद असेल आणि कोरोना रूग्ण जर त्यामुळे दगावत असतील तर तुर्तास वीज वसुलीबाबत अन्य बाबींचा अवलंब करता येऊ शकेल, परंतु लोकांचा जीव वाचला पाहिजे ही बाब अत्यंत महत्त्वाची असल्याने वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश अधिकाऱ्या दिले व आज हा प्रकल्प पुन्हा कार्यान्वित झाला ही बाब महत्त्वाची असल्याचे मत तनपुरे यांनी व्यक्त केले.