नाशिक - येथील डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय आणि संशोधन केंद्रात एका डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू झाला. डॉ. स्वप्नील महारुद्र शिंदे, असे मृत डॉक्टरचे नाव आहे. तो गायनॅकॉलॉजिच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता. तो एमडीच्या पहिल्या वर्षाला होता. या घटनेने खळबळ उडाली आहे.
कुटुंबीयांचा आरोप
स्वप्नीलच्या मृत्यू त्यांच्या कुटुबीयांनी रॅगिंग प्रकरणातून घातपात झाला, असा आरोप केला आहे. जूही गायकवाड आणि सिद्धि फुके या दोन मुली त्याला त्रास देत होत्या. रॅगिंग करणाऱ्या या दोन मुलींसह महाविद्यालय प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. दोन महिन्यांपूर्वी स्वप्नीलने आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची माहिती समोर आली आहे. तर आत्महत्येपूर्वी स्वप्नीलने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये दोन विद्यार्थिनींची नावे लिहिण्यात आली असल्याचा दावा स्वप्निलच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
महाविद्यालयाचे काय म्हणणे..?
दरम्यान, स्वप्नील शिंदे याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांनी केलेल्या आरोपाचे महाविद्यालय प्रशासनाने खंडन केले आहे. आत्महत्या केलेल्या विद्यार्थी डॉक्टरला वेळोवेळी महाविद्यालयाने सहकार्य केले. स्वप्नीलवर मानसोपचार सुरू असल्याची माहिती महाविद्यालय प्रशासनाने दिली आहे. तर मानसिक स्थिती ठीक नसल्याने मृत डॉक्टर विद्यार्थ्याच्या आईला मुलासोबत होस्टेलमध्ये राहण्याची परवानगी देण्यात आली होती. स्वप्नीलची आई त्याच्यासोबत येथेच राहत होती. मात्र, त्यांनीही आपल्याकडे कोणतीही तक्रार केली नाही. पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी प्रतिक्रिया प्राचार्य मृणाल पाटील यांनी केली.
हेही वाचा - तृतीयपंथींचा धिंगाणा, घरात घुसून तोडफोड; महिला-मुलांनाही मारहाण