नाशिक - दिग्विजय सिंह यांना विठ्ठल सद्बुद्धी देवो, ते विठ्ठलाच्या दर्शनाला येतात, सत्तेत येण्यासाठी दिग्विजय सिंह असले विधान करत आहेत, असे भाष्य करणे म्हणजे ते पाकिस्तानला मोटिव्हेट करत आहेत, असे मत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.
मुनगंटीवार नाशिकला विविध विकास कामांच्या भूमी पूजनाच्या कार्यक्रमाला आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी युती, वंचित बहुजन आघाडी, नाणार प्रकल्प अशा विषयांवर देखील भाष्य केले.
नाशिकमधील आमदार देवयानी फरांदे यांच्या मतदार संघातील विविध विकासकामांच्या भूमिपूजनाला सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुनगंटीवार पुढे म्हणाले, की पाकिस्तानला बदलावे लागेल, एअर स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तानला लक्षात आले हा जुना भारत नाही. जगभरातून पाकिस्तावर भारतामुळे दबाव वाढत आहे.
विखे-पाटील भाजपमध्ये येणार हे काय चॅनल समोर सांगायचे का? भाजपमध्ये येण्यासाठी अनेक जण तयार आहे, प्रवेशाबाबत त्यांना विचारा असे मुनगंटीवार यांनी सांगितले. आठवले, मेटे, जानकर, खोत यांची नाराजी दूर केली जाईल, असे ते म्हणाले. अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांचा तिढा युती झाली तेव्हाच सुटला आहे. एकमेकांमधील जो राग आहे तो चर्चेतून सुटेल, असेही मुनगंटीवार म्हणाले.
नाणार प्रकल्प चंद्रपूरला घेऊन जाण्यासाठी मी तयार आहे, त्यासाठी ३०० एकर जागा देखील आहे, मात्र चंद्रपूर किनारी प्रदेश नसल्यामुळे तेथे प्रकल्प नेणे शक्य नाही, असे ते म्हणाले. यावेळी नाशिकच्या मध्य विधानसभा मतदार संघात मुनगंटीवार यांच्या हस्ते ४४.५० कोटींच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. सायकल ट्रक, सावित्रीबाई फुले महिला रुग्णालय, जलतरण तलाव, जागतिक दर्जाचे क्रीडांगण या कामांचा शुभारंभ करण्यात आला.