नाशिक - कोरोना संकटामुळे अनेक उद्योग-व्यवसाय बंद पडले आहेत. यामुळे अनेक कुटुंबात अर्थिक अडचण आहे. परंतु, या परिस्थितीचा विचार न करता शाळा, महाविद्यालयाकडून सतत शुल्क मागणीचा तगादा लावला जात आहे. या पार्श्वभूमीवर सर्व शुल्क माफ करावी यासाठी नाशिक येथे ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन या संघटनेने आंदोलन केले आहे.
'कामगारांचे वेतन वेळेवर होत नाही'
राज्य सरकाने आमची त्वरीत सरसकट शैक्षणिक शुल्क माफ करावी. कोरोनाच्या संकटामुळे सर्व विद्यार्थ्यांच्या घरात आर्थिक अडचण आहे. या पार्श्वभूमीवर सर्वांची शुल्क माफ करून सरकारने या संकट काळात एक दिलासा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईल अशी परिस्थिती असताना, तो काही ठिकाणी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे ठप्प आहेत. कित्येक कामगारांचे वेतन वेळेवर होत नाही. काही कामगारांचे वेतन झालेच, तर ते कमी होत आहे. अशा परिस्थितीत शाळा, महाविद्यालये शैक्षणिक शुल्क वसुलीसाठी तगादा लावत आहेत. अशा परिस्थितीत पालकांनी काय करायचे? आणि कुठुण पैसे आणायचे असा प्रश्न यावेळी उपस्थित केला आहे.
'दुबार पेरणीचे संकट'
हाताला काम नाही, दोन वेळच्या जेवणाची काही लोकांची भ्रांत आहे. यामध्ये मुलांचे शिक्षण कसे करायचे हा मोठा प्रश्न सध्या सर्व पालकांसमोर उभा आहे. काही ठिकणी तर पावसाने पाठ फिरवली आहे. शेतात पेरणीसाठी पैसे खर्च झाले. मात्र, धान्य काही उगले नाही. त्यामुळे आता दुबार पेरणीटे संकट उभा राहिले आहे. तर, दुसरीकडे हा शुल्क वाढीचा विषय. अशा या दुहेरी संकटात सध्या पालक अडकले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर राज्य सरकाने विचार करावा आणि सर्व विद्यार्थ्यांची शुल्क माफ करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
'मागण्या मान्य न झाल्यास मंत्रालयाबाहेर आंदोलन'
शालेय विद्यार्थ्यांची शुल्क असो, किंवा महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची शुल्क असो, ही सर्व फी माफ झाली पाहिजे. या आंदोलनाची सरकारने दखल घेऊन मागण्या मान्य केल्या नाही, तर 5 जुलैला मंत्रालयाबाहेर आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असतानाच, सरकाने शुल्क माफीचा निर्णय घेणे गरजेचे होते. परंतु, हा निर्णय सरकारकडून झाला नाही. शिक्षण शुल्क समिती ही विद्यार्थ्यांच्या विरोधात काम करत असून, ती रद्द करण्यात यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली. ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.