नाशिक - जिल्ह्यातील अभोण्याजवळील त्रंबक नाना मोरे या शेतकऱ्याने पाच लाखांचे कर्ज तसेच काही स्वभांडवल गुंतवून 18 एकरवर 1750 क्विंटल कांदा उत्पादन घेतले होते. परंतु भाव किलोला 5 ते 6 रुपये तर क्विंटलला 500 ते 600 रुपये असल्याने त्यांनी 70 ट्रॉली कांदा चाळीत साठवला होता. परंतु गेल्या दोन महिन्यात बसलेला गारपिटीचा फटका व बदलत्या हवामानामामुळे चाळीतील सर्व सडलेला कांदा काढून त्यावर रोटर फिरविण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली आहे.
नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील कांदा दर्जेदार आणि टिकायला चांगला असल्याने विविध कंपन्या बियाण्यांसाठी येथील कांद्याला अग्रक्रम देतात. त्यामुळे यंदाच्यावर्षी रब्बी हंगामातील कांदा पीकाखालील क्षेत्र वाढले. परंतु कांदा लागवडीपासून तर पीक निघेपर्यंत बळीराजाला निसर्गाने साथ दिली नाही. तरी बळीराजांनी बँकांकडून पीक कर्ज उभारून पीक लागवड करत विक्रमी लागवड केली. काही भागांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीटचा फटका पिकांना बसला. अशात कांद्याला एकरी 60 ते 70 हजार रुपये खर्च येतो. सध्या कांद्याला 300 ते 700 रुपये क्विंटल भाव मिळत असल्याने काही ठिकाणी कांदा सुरक्षितपणे जाळीमध्ये भरला गेला. परंतु आता बहुतेक ठिकाणी कांदा सडण्याचे प्रमाण वाढले आहे, सर्व मेहता, खर्च पाण्यात गेल्याने आता कर्ज फेडायचे कसे असे नवीन संकट शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे.
कांद्याला हमी भाव द्यावा - नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक भागातील चित्र भयावह आहे. सर्वत्र चाळीतील फेकलेल्या सडक्या कांद्याच्या डोंगरावर मेंढ्यांचा कळप, मोकाट जनावरे ताव मारताना दिसतात. शेतकऱ्यांची मेहनत, खर्च वाया गेल्याने शेतकरी हताश झाला आहे. शासनाने शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. कांद्याला हमीभाव द्यावा अशी मागणी शेतकरी संघटनेने सरकारकडे केली आहे.
कांद्याला 16 पैसे किलो दर मिळाला - नाशिक जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला 25 क्विंटल कांद्याचे फक्त 152 रुपये मिळाले. शेतकऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या कांद्याला प्रति किलो फक्त 16 पैसे एवढा दर मिळाला आहे, या शेतकऱ्याला स्वतःच्या खिशातून गाडी भाड्यासाठी पैसे द्यावे लागले. यामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू आले आहेत. नाशिक जिल्ह्यात लासलगाव बाजार समितीत सकाळी 700 ते 900 रुपये क्विंटल दराने खरेदी केलेला कांदा, दुपारी व्यापाऱ्यांनी अवघ्या 200 ते 300 रुपयांनी घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला.
शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन - भाव पाडून खरेदीला आक्षेप घेत काही शेतकरी कांदा विक्री न करता माघारी गेले. तर काहींनी ट्रॅक्टरमधील कांदा घेऊन बाजार समितीच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. अशात बाजार समितीमध्ये सभापती आणि उपसभापतींची निवडणूक प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे कांदा लिलावावर बाजार समितीचे लक्ष नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी करत या घटनेचा निषेध केला.