नाशिक - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल कोरोनाच्या सावटामुळे लांबणीवर पडला होता. तो निकाल बुधवारी (दि. 29 जुलै) ऑनलाईन पद्धतीने लागला आहे. यात नाशिक विभागाचा निकालात मागील वर्षीच्या तुलनेत 16 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यावर्षी नाशिक जिल्ह्यात 202 केंद्रांवर 97 हजार 912 विद्यार्थ्यांनी तर विभागातील 2 लाख 16 हजार 375 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. बारावीचा निकाल लागल्यानंतर दहावीच्या निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.
यावर्षी राज्याचा निकाल 95.30 टक्के लागला असून नाशिक जिल्ह्याचा निकाल 93.73 टक्के लागला आहे. तर यंदाची सर्वाधिक टक्केवारी कोकण विभागात नोंदविली गेली आहे. कोकण विभागाचा निकाल 98.77 टक्के इतका लागला आहे. तर सर्वात कमी निकाल 92 टक्के इतका लागला असून यावर्षी औरंगाबाद विभाग दहावीच्या निकालात मागे पडले आहे. दरम्यान, नाशिक विभागात यावर्षी देखील मुलींनी बाजी मारली असून कॉपीमुक्त अभियान आणि तणावमुक्त परीक्षा तसेच समुपदेशनाचा प्रभाव यंदा नाशिक विभागात बघायला मिळत असल्याचे मत नाशिक विभागीय मंडळाच्या विभागीय सचिव नितीन उपासनी यांनी व्यक्त केले. तसेच उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षणाचा विचार करता वेबिनार घेण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.
दरवर्षी दहावीचा निकाल साधारण जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर केला जातो. मात्र यंदा कोरोनामुळे सर्वच निकालांना उशीर झाला आहे. मात्र, उशिरा का होईना ऑनलाईन निकाल लागल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले आहे. तर विद्यार्थ्यांनीही आपला निकाल लागल्याचा आनंद व्यक्त केला आहे.