नाशिक - मालेगाव तालुक्यातील वडगाव येथे कांदा रोपावर अज्ञात समाजकंटकांनी रात्रीच्या सुमारास तणनाशकाची फवारणी करून शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान केले आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
30 हजारांहून अधिकचे नुकसान
केंद्र शासनाने कांद्यावरील निर्यातबंदी, कांदा व्यापाऱ्यांवर आयकर विभागाने केलेली छापेमारी तसेच कांदा बियाणे चोरीच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याने आधीच कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलेले आहेत. आता काही अज्ञातांकडून कांदा रोपांवर तणनाशक औषधाची फवारणी करून शेतकऱ्यांचे नुकसान करत त्यांना आणखी हतबल करण्याचा प्रयत्न काही अज्ञात समाजकंटकांनी सुरू केला आहे. मालेगाव तालुक्यातील वडगाव येथे राहणाऱ्या एका शेतकऱ्याच्या कांदा रोपांवर मंगळवारी रात्रीच्या सुमारास काही अज्ञातांनी तणनाशकाची फवारणी करून पिकांचे नुकसान केले. यात जवळपास 25 ते 30 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
'समाजकंटकांचा पोलिसांनी शोध घ्यावा'
आता या अज्ञात समाजकंटकांना शोधून पोलिसांनी कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी वडगाव येथील शेतकऱ्यांनी केली आहे.