नाशिक - पाकिस्तानी दहशतवादी झकी उर रहेमान लखवीला पाकिस्तानमधील लाहोरच्या दहशतवाद विरोधी न्यायालयाने दहशवाद्यांना पैसे पुरवल्याच्या कारणावरून दोषी ठरवत 15 वर्षांच्या कारावसाची शिक्षा सुनावली आहे. मुंबईतील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात लखवी हा प्रमुख आरोपी असून तो 2019 पासून जामिनावर होता. टेरर फिडिंग प्रकरणात त्याला ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. मात्र, 26/11 च्या खटल्यात त्याला शिक्षा होत नाही तोपर्यंत समाधान नाही, असे स्पष्ट मत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले. पाकिस्तानवर आंतराष्ट्रीय दबाव असल्याने नाइलाजाने पाकिस्तान ही कारवाई करत असल्याचा आरोपही निकम यांनी केला आहे.
हापिज सईदवर कारवाई का नाही
26/11 च्या हल्ल्यात झकी उर रहेमान लखवी जेवढा दोषी आहे, तेवढाच दोषी लष्कर-ए-तोयबा ह्या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हापिज सईद देखील आहे. मुंबई पोलिसांनी कसाबला ताब्यात घेतल्यानंतर त्याने आपल्या जबाणीत ह्याचे नावे सांगितले होते. ते आम्ही पाकिस्तान न्यायालयासमोर देखील मांडले होते. मात्र, तरी देखील पाकिस्तान हापिज सईदवर कुठलीच कारवाई करत नाही. डेव्हिड हेडलीने देखील पाकिस्तानच्या दहशतवादी कारवाईबाबत अनेक पुरावे दिले होते. मात्र, पाकिस्तान सरकारला दहशतवाद संपवायचा नसून लष्करे तोयबाच्या अडून भारतावर दहशतवादी कारवाया करायच्या असल्याचे सरकारी वकील उज्वल निकम यांनी म्हटले आहे.