नाशिक- जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे नाशिकचे गंगापूर धरण 80 टक्के भरले. सोमवारी या धरणातून गोदावरी नदीपात्रात एक हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला. यामुळे गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी वाढलेली आहे.
गोदावरी नदीच्या पाण्याती पातळी वाढल्याने गंगापूर रोडवर असलेला प्रसिद्ध सोमेश्वर धबधबा ओसंडून वाहतोय. हे निसर्गरम्य दृश्य आपल्या मोबाइलमध्ये संग्रहित करण्यासाठी पर्यटकांची मोठी चढाओढ दिसून आली. मात्र, असे असले तरी जीवाची परवा न करता काही पर्यटक हे नदीच्या कठड्यावर उभे राहून सेल्फी काढत होते. काही वेळा नंतर पोलीस प्रशासनाच्या ही बाब लक्षात आल्या नंतर त्यांनी लोकांना नदीपासून दूर केले.
निसर्गाचा आनंद घेताना जीव धोक्यात घालून सेल्फीचा अट्टाहास का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. पावसाची संततधार अशीच सुरू राहिली तर गंगापूर धरणातून अधिक पाण्याचा विसर्ग करण्यात येईल, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.