नाशिक - कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी 'मिशन झिरो नाशिक' अंतर्गत स्मार्ट हेल्मेट स्क्रिनिंग उपक्रमाला आजपासून (शनिवार) सुरुवात करण्यात आली आहे. मुबई, पुण्यानंतर नाशिकमध्येही या हेल्मेटद्वारे एका मिनिटांत 200, एका तासात 12 हजार तर दिवसभरात एक लाख 30 हजार रुग्णांचे स्क्रिनिंग करण्यात येणार आहे. यामुळे नाशिक मनपाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या 'मिशन झिरो नाशिक' उपक्रमाला पाठबळ मिळणार आहे.
नाशिक शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोनाचा धुमाकूळ सुरुच आहे. वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाशिक मनपाच्यावतीने विविध सामाजिक संघटनांना सोबत घेऊन विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. यात गेल्या महिनाभरापासून नाशिक शहरातील प्रादुर्भाव नियंत्रणात यावा, म्हणून 'मिशन झिरो नाशिक' हा उपक्रम राबविण्यात येत आहे. जैन संघटना आणि नाशिक मनपाच्यावतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. उपक्रमाअंतर्गत नाशिक शहरात मोबाईल डिस्पेंसरी व्हॅनद्वारे ठीक ठिकाणी नागरिकांच्या रॅपिड अँटीजेन चाचण्या करण्यात येत आहेत. यात नावीन्यपूर्ण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येत आहे. तसेच परदेशातून मागविलेल्या स्मार्ट हेल्मेटद्वारे एकाच वेळेस गर्दीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शारीरिक तापमान तपासणीची मोहीम सुरू करण्यात आली आहे.
हेही वाचा - पुण्यातील सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयातील आगीवर नियंत्रण; जीवितहानी नाही
स्मार्ट हेल्मेट धारण केलेले तंत्रज्ञ भाजीपाला मार्केट, बाजारपेठांमध्ये फिरत आहे. याद्वारे ते जास्त शारीरिक तापमान असलेल्या व्यक्तींना थर्मल स्क्रिनिंग तंत्रज्ञानाने शोधून काढणार आहेत. त्यानंतर अशा व्यक्तींची ऑक्सिजन लेव्हल तपासली जाईल आणि त्यातून आवश्यक असलेल्या संभावित रुग्णांची अँटीजेन किंवा आरटीपीसीआर चाचणी त्याच ठिकाणी केली जाईल. अशा पद्धतीने गर्दीच्या ठिकाणी सुप्तपणे आणि अलाक्षणिक स्वरुपात फिरणाऱ्या रुग्णांना शोधून पुढील संसर्ग रोखणे शक्य होणार आहे.
दरम्यान, या हेल्मेटद्वारे एका मिनिटांत 200, तासाला 12 हजार तर दिवसभरात एक लाख 30 हजार रुग्णांचे स्क्रिनिंग करण्यात येणार आहे. यामुळे आता नाशिक शहरातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावाला रोखण्यात मनपा प्रशासनाला नक्की यश येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.