नाशिक - स्मार्ट सिटीच्या यादीत नाशिक शहराची निवड झाली आणि अनेक कामांना गती आली. मात्र, ती स्मार्ट काम आता नाशिककरांची डोकेदुखी ठरत आहे. शहरातील अनेक स्मार्ट कामे अजूनही कागदावरच आहेत. तर विशेष म्हणजे शहराची वाहिनी मानली जाणारा अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका रोडचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू असून ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे अद्याप ते पूर्ण झालेले नाही. त्यामुळे नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
नाशिक शहरातील मध्यवर्ती ठिकाणी आणि अतिशय वर्दळीचा मार्ग म्हणजे अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका रस्ता. मात्र, या रस्त्याचे गेल्या वर्षभरातून स्मार्ट सिटी अंतर्गत काम सुरू आहे. १७.५ कोटीचा निधी या रस्त्यासाठी देण्यात आला आहे. मात्र ठेकेदार कामाची चालढकल करताना दिसत आहेत. त्यामुळे जवळपास असणारी हुतात्मा स्मारक शासकीय कन्या शाळा तसेच जिल्हा न्यायालय जिल्हाधिकारी कार्यालय येथील अधिकाऱ्यांनाच याचा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, ठेकेदार याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे अशा ठेकेदारांवर कडक कारवाई झाली पाहिजे, असे नाशिककरांचा मत आहे.
अवघ्या एक पॉईंट एक किलोमीटरच्या या स्मार्ट रोडला पूर्ण होण्यासाठी जवळपास वर्ष उलटण्याची वेळ आली आहे. रोडचे काम सुरू झाल्यानंतर सहा महिन्यांची मुदत देण्यात आली होती. मात्र, तेही काम पूर्ण झालेले नाही. त्यानंतर ठेकेदाराला ३१ मार्च ही दुसरी मुदत देण्यात आली. तरीही चाळीस ते पन्नास टक्के काम अपूर्णच आहे. नागरीकांना होणाऱया त्रासाला संबंधित ठेकेदार कारणीभूत आहे. स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांकडून या संदर्भात दिलगिरी व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, संबंधित ठेकेदारावर दंडात्मक कारवाई केली जाईल असे, प्रकाश थवील स्मार्ट सिटी अधिकारी नाशिक यांनी सागितले आहे.