नाशिक- शहरातील पारंपरिक गणेश विसर्जन मिरवणूकीत गणेश मंडळाच्या मुर्त्या मोठ्या वजन आणि उंचीच्या असतात. मात्र, रस्त्यावरील उचल -सकल भागामुळे गणेश मंडळांना हा मार्ग अडचणीचा ठरणार आहे. त्यामुळे या बाबत सार्वजनिक गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात धाव घेत परिस्थिती मांडली. यावेळी गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत येणारे स्मार्ट रोडचे विघ्न दूर करू, असा विश्वास स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासन आणि सार्वजनिक गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना दिला.
सूर्यप्रकाश मित्र मंडळ, नाशिकचा राजा, शिवमुद्रा मित्र मंडळाचा मानाचा राजा व अशोक स्तंभ मंडळाच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या आरसला देखील ह्या अपूर्ण रस्त्यामुळे अडचण निर्माण होणार आहे. या बाबत शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत रस्त्याने कामे सुरू असून, ही काम वेळेच्या आत पूर्ण न झाल्याने ठेकेदाराला स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन कडून रोज दंड आकारणी सुरू आहे. अशात गणेश विसर्जनाचा पारंपरिक मार्ग असलेल्या एमजीरोड भागातील रस्त्यांचे काम सुद्धा संथ गतीने सुरू आहे. त्यात मेहेर सिग्नल ते अशोक स्तंभ महामार्गावर साकारण्यात आलेल्या स्मार्ट रोड हा उंचसखल भाग ठरत आहे.
कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत सोमवंशी यांनी महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांची भेट घेऊन त्यांना विसर्जन मार्गावरील रस्ता लवकरात लवकर पूर्ण करण्याची विनंती केली. यावर आयुक्तांच्या आदेशानुसार स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन,पोलीस प्रशासन आणि गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी मिरवणूक मार्गाची पहाणी केली. गणेश विसर्जन मिरवणुकी आधी हा मार्ग पूर्ण करुन वाहतुकीसाठी खुला कसा सुरू होईल, या बाबत स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांनी ठकेदाराला सूचना दिल्या आहेत.