नाशिक - नाशिक रोड परिसरातील सकाळच्या सुमारास एक रिक्षा उलटून अपघात ( Autorickshaw Overturn ) झाला. यावेळी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या लहान मुलीसह तिचे पालक या रिक्षाच्या कचाट्यात सापडल्याने गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, जेलरोड परिसरातील कॅनॉल रोडवरील मिल्लत पब्लिक स्कूल ( Millat Public School ) समोर दुपारी शाळा सुटल्यानंतर पालक आपल्या पाल्यांना घेण्यासाठी आले होते. त्याचवेळी भरधाव वेगाने जाणाऱ्या एका रिक्षा चालकाचा रिक्षावरील ताबा सुटला. यामुळे रिक्षा उलटली यात रस्त्याच्या कडेला शाळेबाहेर उभे असलेल्यांना जोरदार धडक बसली असून तिघे जखमी झाले आहेत. हाजी चांद शहा ( वय 72 वर्षे ), अब्दुल रझाक मन्सुरी ( वय 62 वर्षे ) आणि अमिना नवाज मन्सूरी ( वय 7 वर्षे), अशी जखमींची नावे आहेत. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील हाजी चांद शहा यांच्या डोक्याला मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
अपघात सीसीटीव्हीत कैद - अपघाताचे थरारक दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, पुढील तपास नाशिकरोड पोलीस करत आहेत. मिल्लत पब्लिक स्कूल ( Millat Public School ) व मिल्लत नर्सिंग होम ( Millat Nursing Home ) ही शैक्षणिक व आरोग्य सेवा पुरवणारी संस्था जेलरोड परिसरात आहे. कॅनॉलरोड मार्गावर सतत वाहनांची वर्दळ सुरू असल्याने शाळेसमोर रस्त्यावर सातत्याने छोटे मोठे अपघात होत असतात.
हेही वाचा - VIDEO: केळीच्या पानावर लतादीदींचे चित्र रेखाटत अनोखी श्रद्धांजली