नाशिक - येवला तालुका हा कोरोनामुक्त होऊन काही दिवस होत नाही, तर परत कोरोनाने येवल्यात शिरकाव केला आहे. शहरातील मूलतानपुरा भागातील 4 जण हे कोरनाबाधित आढळून आले असून तालुक्यातील मुखेड गावातील 2 जणांचे अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आता शहरासह ग्रामीण भागातही कोरोना हळूहळू पाय पसरायला सुरुवात करत आहे.
येवला शहर कोरोनामुक्त झाल्यामुळे सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता. मात्र, परत कोरोनाने तालुक्यात डोके वर काढले असून शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे शहरवासीयांसह ग्रामीण भागातील जनतेची मोठी चिंता वाढली आहे. कोरोनामुक्त झाल्याने शहरात काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली होती. त्यात आठ कंटेन्मेंट झोन वगळता शहरातील ठराविकच दुकाने सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत उघडी ठेवण्यात येत होती. मात्र, आता कोरोनाचे नवीन सहा रुग्ण आढळून आल्याने येवलेकरांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे.