नाशिक - केंद्र आणि राज्यात भाजप-शिवसेना सत्तेत एकत्र असताना नाशिकमध्ये मात्र वेगळे चित्र आहे. स्थायी समितीच्या सभापती निवडणुकीत भाजप-सेनेत लढत होणार आहे. महापालिकेत भाजप सत्तेत तर शिवसेना विरोधी बाकावर आहे.
स्थायी समितीच्या सभापती पदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. भाजप आणि शिवसेनेने अगदी शेवटच्या क्षणी उमेदवार घोषित करत अर्ज दाखल केले. भाजपकडून उद्धव निमसे तर शिवसेनेकडून कल्पना पांडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. भाजपमध्ये सभापती पद मिळवण्यासाठी पालकमंत्र्यांपर्यंत जोरदार फिल्डिंग लावण्यात आली होती. गणेश गीते, यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, ऐनवेळी भाजपने त्यांचा पत्ता कापला.
स्थायी सभापती भाजपकडून सोमवारी रात्री उशिरा 3 नावे निश्चित करण्यात आली होती. यात गणेश गीते, स्वाती भामरे आणि उद्धव निमसे यांचा समावेश होता. भाजपच्या कमलेश बोडके यांनी सभापती पदासाठी सर्व ताकद पणाला लावली. मात्र, त्यांचा पत्ता कट करण्यात आला. वरिष्ठ पातळीवरून अखेरच्या क्षणी उद्धव निमसे यांचे नाव अंतिम झाल्याचे गटनेते जगदीश पाटील यांनी सांगितले.
कल्पना पांडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे, चंद्रकांत खाडे, सुधाकर बडगुजर उपस्थित होते.