नाशिक - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि शिवसेनेचे पदाधिकारी शिवाजी चुंभळे यांचे बाजार समितीचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी कंत्राटी कामगारांना कायम करण्यासाठी तीन लाख रुपयाची लाच स्वीकारल्याने त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. कृषी उत्पन्न खरेदी-विक्री नियमानुसार समिती पदाचा दुरुपयोग केल्याने त्यांना बाजार समितीच्या सदस्य पदावरुन काढून टाकण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांनी दिलेत.
हेही वाचा-युतीची चर्चा सुरू असताना शिवसेना पदाधिकारी स्वबळावर लढण्याच्या तयारीत
शिवाजी चुंभळे हे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 26 जुलै 2015 ला झालेल्या निवडणुकीत समिती सदस्य म्हणून निवडून आले होते. तर 20 जुलै 2017 ला समितीच्या सभापतीपदी त्यांची निवड झाली होती. 18 ऑगस्ट 2019 ला त्यांना कंत्राटी कामगारांना कायम करण्यासाठी 3 लाखांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. तसेच त्यांच्या घराची झडती घेतली असता, लाखो रुपयांचा विदेशी मद्याचा साठा त्यांच्या घरात मिळून आला होता. ह्या प्रकरणात देखील एसीबीच्या प्रकरणातून जामीन मिळताच राज्य उत्पादन शुल्क विभागाने अटक केली होती. ह्या प्रकरणा नंतर त्यांना जिल्हा उपनिबंधक विभागे कारणे दाखवा नोटीस बजावली होती. बाजार समितीच्या विरोधी गटातील संचालकांनी चुंभळे यांना 48 तासांपेक्षा जास्त कालावधीसाठी अटक झाली असल्याने त्यांना राज्य कृषी उत्पन्न पणनच्या कायद्यानुसार सदसत्व पदावरुन निलंबित करावे, अशी मागणी केली. त्यानुसार जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने शिवाजी चुंभळे यांचे सदस्यत्व रद्द केले आहे. मात्र, ह्या विरोधात उच्च न्यायालयात जाणार असल्याचे शिवाजी चुंभळे यांनी म्हटले आहे.