नाशिक - पालकमंत्री छगन भुजबळ हे भाई युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी नाही तर ते प्राचार्य आहे. ते भ्रष्टाचार युनवर्सिटीचेही प्राचार्य असून भाजीपाला विकणारे भुजबळ २५ हजार कोटींचे मालक कसे झाले? असा सवाल उपस्थित करत नांदगावच्या विकासकामांच्या जिल्हा नियोजन समितीचा निधी विकणार्या भुजबळांना पालकमंत्री पदावरुन हटवावे, अशी मागणी शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी केली आहे.
'भुजबळांना नियोजन निधी वाटपाचा अधिकारच नाही'
विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेत कांदे यांनी भुजबळांवर पुन्हा निशाणा साधला आहे. भुजबळ आणि माझा वाद हे महाविकास आघाडीचे भांडण नाही. बाळासाहेबांना अटक करणार्या भुजबळांशी माझा वाद आहे. नांदगावसाठी बारा कोटी निधी आला. यातील दहा कोटी ठेकेदारांना भुजबळांनी वाटले. माझ्या मतदारसंघात फक्त दोन कोटी दिले. भुजबळांना नियोजन निधी वाटपाचा अधिकारच नाही. अधिकार नसतांना, छगन भुजबळ यांनी वाटप करून गैरव्यवहार केला. भुजबळांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे माझ्याकडे पुरावे आहे. समता परिषदेला त्यांनी हा निधी दिला. मी त्यांच्यासमोर केव्हाही चर्चेला तयार आहे. भुजबळांनी माझ्याशी वन टू वन चर्चा करावी. मी माझ्याजवळचे पुरावे मुख्यमंत्री व अजित पवारांना दिले आहेत. याप्रकरणी मी न्यायालयात गेलो असून जिल्हाधिकार्यांनाही प्रतिवादी केले आहे.
'धमकीचा तपास पोलीस आयुक्त करतील'
गुन्हेगार कधी गुन्हा केला हे सांगत नाही. अक्षय निकाळजे यांच्याविरोधात केलेल्या तक्रारीचा पोलीस आयुक्त तपास करतील. भुजबळांनी मुंबईच्या टेकचंदानी या व्यापाराला धमकीचा फोन होता. भुजबळांची ही अशी पार्श्वभूमी सर्वांना माहित आहे, असा घणाघात सुहास कांदे यांनी केला.
हेही वाचा - मरोळ मरोशीत मेट्रो चाचणी: आरेतील एकाही वृक्षाला धक्का लावू नका- मुख्यमंत्र्यांचे निर्देश