नाशिक - मुंबईचे माजी पोलीस आतुक्त परमबीर सिंह हे चांगले अधिकारी आहेत. त्यांच्या पत्राने सरकारवरच्या प्रतिमेवर शिंतोडे नक्कीच उडाले. हे मान्य करण्याचा आमच्यात मोठेपणा आहे. लेटरची सत्यता तपासून पाहिली जाईल. मुख्यमंत्री आणि शरद पवार यात लक्ष देतील व योग्य निर्णय घेतील, असे मत शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परबिरसिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर पत्रातून गंभीर आरोप केले आहेत. त्यावर प्रतिक्रिया देताना राऊत बोलत होते.
प्रत्येकाने नक्कीच आत्मपरीक्षण करण्याची गरज-
अँटिलिया आणि मनसूख हिरेन मृत्यू प्रकरणात पोलीस दलात झालेल्या बदल्यांच्या कारवाईनंतर अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. परमबीरसिंह यांची उचलबागडी झाल्यानंतर त्यांनी पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महिन्याला १०० कोटीच्या हप्पा गोळा करण्यास सांगितले होते, असा गौप्यस्फोट केला. त्यानंतर महाराष्ट्रात खळबळ माजली. या सर्व घडोमोडीवर बोलताना राऊत म्हणाले, महाराष्ट्रात नक्कीच हा चर्चेचा विषय ठरला आहे. लोक म्हणतात हा लेटर बॉम्ब आहे. मात्र यात सत्यता किती हे मुख्यमंत्री आणि शरद पवार तपासून बघतील. स्वतः गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्राच्या चौकशीची मागणी केली आहे. मात्र प्रत्येकाने नक्कीच आत्मपरीक्षण करण्याची गरजेचे असल्याचेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
काही तरी दुरुस्त करावे लागेल-
आशा प्रकारचे आरोप होणे हे दुर्दैवी आहे. ज्यांनी हे सरकार यावे म्हणून खारीचा वाटा उचलला अशा आमच्या सारख्यांसाठी हे धक्कादायक आहे. प्रत्येकाने आपले पाय नक्की जमिनीवर आहेत का? हे तपासले पाहिजेत. माझी यात वैयक्तिक भूमिका नाही. मात्र पोलीस प्रशासन हा कोणत्याही सरकारचा कणा असतो. पोलिसांकडे आम्ही कणा म्हणून पाहतो, आमची राजवट देखील उत्तम चालली आहे, पण काही तरी दुरुस्त करावे लागेल, असे म्हणत संजय राऊत यांनी या प्रकरणात खंत व्यक्त केली आहे.
पत्राचा तपास करावा, असे स्वतः गृहमंत्र्यांनी सांगितले-
आरोप करणारे माजी पोलीस आयुक्त आहेत. एका प्रकरणात त्यांना पदावरून जावं लागलं आहे. पण त्यांच्या पत्रावर तपास करावा, असे स्वतः गृहमंत्र्यांनी सांगितले आहे. या संदर्भात योग्य भूमिका आणि निर्णय घेण्यासाठी पवार साहेब भूमिका पार पाडतील. मी पवार साहेबांशी दिल्लीत भेटेलो असल्याचेही राऊत म्हणाले. तसेच विरोधी पक्षाने मागणी केली म्हणून सरकार चालत नाही, असा टोलाही लगावत त्यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे.
माझ्या ट्विटचा अर्थ लवकरच कळेल...
72 तासात सरकारवर शिंतोडे उडाले, हे मान्य करण्याचा मोठेपणा माझ्याकडे आहे. कारण मी सरकारचा 4 पैशांचा देखील ओशाला नाही. यातून कस धुवून काढायचं यासंदर्भात एकत्र बसून निर्णय घेतला जाईल. मुख्यमंत्र्यांनी सरकारची प्रतिमा चांगली ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न केला. काही गोष्टींवर योग्य वेळी निर्णय घेणे अपेक्षित होते. पण सत्तेपुढे शहाणपण नसते, असे सांगत माझ्या ट्विटचा अर्थ लवकरच समजेल, असे सूतोवाच त्यांनी दिले.