नाशिक - विधानसभेवर भगवा फडकणार ही भाषणे मी गेल्या ३० वर्षांपासून ऐकत आलो आहे. त्यावर इतकी चर्चा कशासाठी? प्रत्येक पक्ष आपला विस्तार करीतच असतो. त्यात काहीच गैर नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नाशिकच्या पत्रकार परिषदेत म्हटले आहे. खासदार शरद पवार आज नाशिक दौऱ्यावर होते.
सुरुवातीला पवारांनी दिवंगत ज्येष्ठ नेते विनायक पाटील यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यानंतर कांदा उत्पादक शेतकरी व व्यापाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. विधानसभेवर स्वबळावर भगवा फडकणार, असे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात केले होते. याच पार्श्वभूमीवर बोलताना पवारांनी हे वक्तव्य केले आहे.
'भारतीय जनता पक्षाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी आम्ही तिन्ही पक्ष राज्यात एकत्र आलो. त्यातून राज्याचा कारभार केला जात आहे. त्याची चांगली फळं दिसत असल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यामुळे या आघाडीतील एखादा पक्ष स्वतःचे काही संघटनात्मक कार्यक्रम राबवत असेल तर त्याबाबत फार मनाला लावून घेण्याचा विषय नसतो, असेही पवार म्हणाले. कॉंग्रेसनेदेखील पक्ष विस्तारासाठी काही उपक्रम राबविले तर त्याचा वेगळा अर्थ निघत नाही. तसेच शिवसेनेने मेळावे घेतले. काही विधाने केली. संघटनात्मक विस्ताराचे कार्यक्रम केले, तर त्याचा अर्थ त्यांनी महाविकास आघाडीतील पक्षांपेक्षा वेगळा विचार मांडला असा होत नाही. प्रत्येक पक्षाला संघटनात्मक विस्ताराचा कार्यक्रम राबविण्याचा अधिकार आहे, असे पवारांनी स्पष्ट केले.