नाशिक - मोदी सरकार ही देशातील राष्ट्रीय आपत्ती असल्याचे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारवर निशाणा साधला. विरोधकांचा सन्मान न करणारे मोदी हे आजवरचे पहिले पंतप्रधान आहेत. ते इतर राज्यातील मुख्यमंत्र्यांना योग्य वागणूक न देता त्यांच्यावर टीका करत असल्याचेही पवार म्हणाले.
नाशिकमध्ये कॉग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची संयुक्त बैठक सुरु आहे. या बैठकीत बोलताना पवारांनी मोदींसह सरकारवर चांगलाच निशाणा साधाला. आजवर देशात विरोधकांचा सन्मान केला जात होता. मात्र, सद्या सत्तेचा गैरवापर केला जात आहे. हे सुसंस्कृत लोकांचे लक्षण नाही. प्रधानमंत्री हा देशाचा असतो. तो कुठल्या पक्षाचा नसतो. मात्र, सध्या देशातील मोदींचे सरकार ही राष्ट्रीय आपत्ती असल्याचे पवार म्हणाले.
राज्याच्या प्रमुखाने विरोधकांशी सन्मानाने वागविण्याची गरज आहे. छगन भुजबळ यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला जामिनावर आहात अशी भाषा केली जाते. हे सुसंस्कृत लोकांचे लक्षण नसल्याचे म्हणत पवारांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावही टीका केली. छगन भुजबळ हे अडचणीतून बाहेर पडले आहेत. महाराष्ट्रातील लोकांमध्ये ते जागृती निर्माण करण्यासाठी लढत असून ही गौरवाची बाब आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज हॉटेल एमरॉल्ड पार्क येथे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची संयुक्तिक बैठक पार पडली. त्यावेळे ते बोलत होते.
नेहरुंनी लोकशाहीला दिशा देण्याचे काम केले - पवार
लोकशाहीला संसदीय पद्धतीने दिशा देण्याचे काम जवाहरलाल नेहरू यांनी केले. त्यामुळे आजवर लोकशाही टिकली. जगात भारताला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम त्यांनी केले. आधुनिक विज्ञानाचा पुरस्कार त्यांनी केला. इंदिरा गांधी यांनी देशाचा इतिहास नाही तर भूगोल बनवला आहे. त्यामुळे संपूर्ण देशातील गरीब जनता ही इंदिरा गांधी यांच्याशी एकरूप झाली होती. त्यामुळे त्या लोकप्रिय बनल्या होत्या. मात्र आजचे प्रधानसेवक हे देशात गेल्या साठ वर्षात काय केले अशी भाषा करत आहेत. हे कोणालाही न पटणारे असल्याचे पवार म्हणाले.
ज्या घरण्यावर आजचे पंतप्रधान टीका करतात त्या इंदिरा गांधींनी देशाला स्थिर सरकार दिले. देशाची प्रतिष्ठा वाढवली. राजीव गांधी यांनी आधुनिकतेची कास धरल्याने आज देशात तंत्रज्ञानाचा विकास झाला. ज्यांनी देशासाठी योगदान दिले त्यांच्यावरच टीका केली जाते. हे सुसंस्कृत पणाचे लक्षण नसून या भूमिकेला सक्त विरोध करून आपल्याला एकत्र येण्याची गरज आहे. त्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते माझ्यासाठी सारखेच आहेत त्यात कुठलाही दुजाभाव नसल्याचे पवार म्हणाले.
यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री विनायक पाटील, प्रशांत हिरे, आमदार हेमंत टकले, माजी मंत्री शोभाताई बच्छाव, माजी खासदार समीर भुजबळ, देविदास पिंगळे, आमदार निर्मला गावित यांच्यासह मोठ्या संख्येने दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते.