नाशिक : मनसे नेते अमित ठाकरे हे उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. धुळे, नंदुरबारनंतर शनिवारी त्यांनी अहमदनगरमधे कार्यकर्त्यांची भेट घेतली. त्यानंतर अमित ठाकरे हे मुंबईच्या दिशेने येत होते. रात्री अडीच वाजेच्या सुमारास सिन्नर तालुक्यातील गोंदे फाटा या ठिकाणी असलेला बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा टोल नाका, मनसे नाशिक शहर अध्यक्ष दिलीप दातीर यांसह त्यांच्या 10 ते 15 कार्यकर्त्यांनी फोडला. याप्रकरणी पोलिसांनी गंभीर दखल घेत शुभम थोरात, शैलेश शेलार, बाजीराव मते, ललित वाघ, प्रतीक राजगुरू, शशिकांत चौधरी, स्वप्निल पाटोळे या मनसैनिकांना अटक केली आहे. याप्रकरणातील चार ते पाच जण फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
म्हणून फोडला होता टोल नाका : मनसे नेते अमित ठाकरे यांना टोलनाक्यावर अर्धा तास थांबवल्यानंतर संतप्त झालेल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तोडफोड केल्याचे समोर आले आहे. या तोडफोडीत संपूर्ण समृद्धी टोलनाक्याचे नुकसान झाले. 22 जुलै रोजी सायंकाळी अमित ठाकरे अहमदनगरहून सिन्नरच्या दिशेने जात होते. समृद्धी महामार्गच्या सिन्नर टोल प्लाझा येथे अमित ठाकरे यांचा ताफा सुमारे अर्धा तास थांबला होता. यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी मध्यरात्री टोलनाक्याची तोडफोड केली.
राज ठाकरेंनी केले होते आंदोलन : काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील टोल नाक्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रणशिंग फुंकले होते. प्रदीर्घकाळ चाललेल्या या आंदोलनावेळी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी टोलनाके फोडण्याचे प्रकार घडले होते. तसेच त्याठिकाणी मोठ्या स्वरूपात आंदोलन झाले होते. त्यानंतर राज्य सरकारने राज्यातील तब्बल सत्तरहून अधिक टोलनाके बंद करण्याचे आदेश दिले होते.
हेही वाचा -