नाशिक - ग्रामपंचायत निवडणुकीचा निकालानंतर विजयाचा गुलाल उधळला गेला असून आता येत्या गुरुवारी (दि.२८) ११ तालुक्यातील ८१० ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत निघणार आहे. तालुका स्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत काढली जाईल. त्याकडे राजकीत वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
तहसीलदार स्तरावर आरक्षण सोडतीचे अधिकार -
जिल्ह्यातील ५६५ ग्रामपंचायतीचे निकाल सोमवारी (दि.१८) लागले. त्यानंतर गावचा सरपंच कोण होणार याकडे लक्ष लागून होते. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील अंशत:अनुसुचित क्षेत्रातील पाच तालुके आणि बिगर अनुसूचित क्षेत्रातील सहा तालुके अशा ११ तालुक्यांसाठीच्या ८१० ग्राम पंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत गुरुवारी निघणार आहे. प्रत्यक्ष मतदानापूर्वीच ५५ ग्रा़मपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. देवळा तालुक्यातील उमराणे येथील निवडणूक प्रक्रिया निवडणूक आयोगाने रद्द केली होती. निकालानंतर या ६२१ ग्राम पंचायतीचे सरपंच कोण असतील याची उत्सूकता शिगेला पोहचली आहे. त्यासाठीच्या आरक्षण सोडतीची तारीख देखील ग्रामविकास विभागाने जाहीर केलीआहे.
जिल्ह्यात १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२५ या पाच वर्षाच्या काळासाठी १ हजार ३८५ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठीचे हे आरक्षण जाहीर होणार आहे. त्यातील पेठ, सुरगाणा, कळवण व त्र्यंबकेश्वर या चार पुर्णत:अनुसूचित क्षेत्रासाठीच्या ५७५ ग्रामपंचायतींचे आरक्षण वगळून उर्वरीत ११ तालुक्यांसाठीच्या ८१० ग्रामपंचायतींसाठी ही आरक्षण सोडत राबवली जाणार आहे. तहसिलदार स्तरावर आरक्षण सोडतीचे अधिकार देण्यात आले आहे. आरक्षण सोडतनंतर सरपंचपदासाठी निवडणूक होईल.
सरपंच पदाचे आरक्षण संख्या
तालुका | ग्रा.पं संख्या | अनुसुचित जाती | अनुसुचित जमाती | ना.मागास प्रवर्ग | सर्वसाधारण |
देवळा | २० | १ | २ | ५ | १२ |
दिंडोरी | १७ | १ | १ | ५ | १० |
इगतपुरी | ३२ | २ | ३ | ९ | १८ |
बागलाण | ८१ | ४ | १२ | २२ | ४३ |
नाशिक | ३५ | ३ | ४ | ९ | १९ |
मालेगाव | १२५ | ८ | १९ | ३४ | ६४ |
चांदवड | ९० | ६ | १३ | २४ | ४७ |
नांदगाव | ८८ | ६ | १३ | २४ | ४५ |
निफाड | ११९ | ९ | १८ | ३२ | ६० |
येवला | ८९ | ७ | १० | २४ | ४८ |
सिन्नर | ११४ | ७ | १४ | ३० | ६३ |
एकूण | ८१० | ५४ | १०९ | २१८ | ४२९ |