नाशिक - जिल्ह्याच्या ग्रामीण आणि दुर्गम भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नाशिकच्या सपकाळ नॉलेज हब या संस्थेने पीपीई किट आणि 'एन ९५' मास्क मोफत उपलब्ध करून दिले आहेत. पोलीस, वैद्यकीय कर्मचारी आणि महसूली कर्मचाऱ्यांना या किटचा फायदा होणार आहे.
राज्यभर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कोरोनाशी लढा देणारे वैद्यकीय कर्मचारी, महसुली कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. यातच कोरोनाबाधितांच्या संपर्कात येऊन काही डॉक्टरांनाही आपला जीव गमवावा लागला आहे. या कर्मचाऱ्यांना पीपीई किट मिळावे, अशी मागणी होत असताना या किटचा राज्यभर तुटवडा निर्माण झालेला आहे. अशात नाशिकच्या सपकाळ नॉलेज हब या संस्थेने पुढाकार घेत 200 हून अधिक पीपीई किट उपलब्ध करून दिले आहे. या पीपीई किट आणि 'एन ९५' मास्कमुळे कोरोनाशी लढा देणाऱ्या या कर्मचाऱ्यांना संरक्षण मिळणार आहे. त्र्यंबकेश्वर रोडवरील सपकाळ नॉलेज हबच्या मुख्य कार्यालयात आज हे पीपीई किट पोलीस, महसूल आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना सुपूर्द करण्यात आले.
सामाजिक बांधिलकी जोपासत सपकाळ नॉलेज हब या संस्थेने उपलब्ध करून दिलेल्या या पीपीई किट आणि 'एन ९५' मास्कमुळे आरोग्य, पोलीस आणि महसूल कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. सपकाळ नॉलेज हब या संस्थेने जोपासलेल्या या सामाजिक बांधिलकी बद्दल शासकीय अधिकाऱ्यांनी देखील या संस्थेचे आभार मानले आहे. यावेळी सपकाळ नॉलेज हबचे अध्यक्ष रवींद्र सपकाळ यांच्यासह कल्याणी चारीट्रेबल ट्रस्टच्या उपाध्यक्ष कल्याणी सपकाळ, अन्न व औषध प्रशासनाचे उपायुक्त डॉक्टर दुशंत भामरे, नाशिक ग्रामीण पोलीस विभागाचे उपधीक्षक भीमाशंकर ढोले, त्रंबकेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामचंद्र करपे, त्र्यंबकेश्वर सामान्य रुग्णालयाचे डॉक्टर आणि तहसीलदार उपस्थित होते.