नाशिक - कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या प्रवेशद्वारवर सॅनिटायझर चेंबर उभारण्यात आले. आता या चेंबरमधून प्रेवश केल्यावरच रुग्णालयात प्रवेश मिळणार आहे.
नाशिक जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून जिल्हा आरोग्य विभाग विशेष काळजी घेत आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या प्रवेशद्वारवर सॅनिटायझर चेंबर उभारण्यात आले. जिल्हा रुग्णालयात विशेष कोरोना कक्ष असून अनेक कोरोनाबाधित रुग्ण तसेच कोरोना संशयित रूग्णांना येथे ठेवण्यात आले आहे.
या रुग्णालयात जिल्ह्यातून दररोज शेकडो रुग्ण विविध आजारांवर उपचार घेण्यासाठी येतात. रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या सुरक्षेच्यादृष्टीने सॅनिटायझर चेंबर उभारल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले. नाशिक जिल्ह्यातील विविध रुग्णालयात 42 कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत असून अनेक कोरोना संशयित रुग्णांची तपासणी केली जात आहे.