नाशिक - मागील सात महिन्यात ऑनलाइन फसवणुकीतून दोन कोटींचा गंडा घातला गेला आहे. सायबर क्राइममध्ये दाखल झालेल्या तक्रारीवरुन ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात सर्वाधिक ऑनलाइन फसवणूकीच्या तक्रारी लॉकडाऊन काळात दाखल झाल्या आहेत.
नाशिक शहरात दिवसेंदिवस सायबर गुन्ह्यात वाढ होत आहे. मागील सात महिन्यात तब्बल दोन कोटींची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. लॉकडाऊन काळात सर्वच जण घरी असल्याने ऑनलाइन पेमेंटचा वापर मोठ्या प्रमाणात झाला. याचाच फायदा घेत विविध प्रकारचे आमिष दाखवत सायबर चोरट्यांनी नागरिकांचे बँक खाते रिकामे केले.
नागरिकांना गंडा घालण्यासाठी सायबर चोरट्यांनी विविध फंडे वापरले. विविध बँकेच्या ग्राहकांशी संपर्क साधून क्रेडीट कार्डची मर्यादा वाढवून देणे, कर्ज देणे, रिवार्ड पॉइंट देणे, कॅशलेस मेडिकलचा लाभ मिळवून देणे, क्रेडिट कार्डचे व्हेरिफिकेशन करायचे आहे तसेच विविध प्रकारचे आमिष दाखवून चोरट्यांनी नागरिकांना गंडा घातला.
- याबाबत 15 दिवसात 95 गुन्हे दाखल -
नाशिकच्या सायबर पोलीस ठाण्यात जुलै महिन्यात 15 दिवसात 95 गुन्हे दाखल झाले आहेत. यात नागरिकांच्या बँक खात्यातून 5 ते 40 हजारांपर्यंतची रक्कम अचानक गायब होत असल्याने सायबर पोलीस देखील चक्रावले आहेत. यात आता नागरिकांना 24 लाखांचा गंडा घालण्यात आला आहे.
- सायबर गुन्ह्यात आरोपीपर्यंत पोहचणे कठीण -
सायबर गुन्हे करणाऱ्या टोळ्या या गुडगाव, बिहार, उत्तर प्रदेश, नोएडा आदी. भागातील असल्याचे आढळून आले आहे. सायबर गुन्हेगार हा क्राइम करताना मोबाइल सिम कार्ड तिऱ्हाईताच्या नावाचे वापरतो. बँकचे अकाउंटदेखील दुसऱ्याच्या नावावर असते, असे तपासात आढळून येत आहे. तसेच 10 ते 20 हजार रुपयांच्या फसवणुकीत राज्याबाहेर पोलिसांची टीम घेऊन जाऊन आरोपीचा शोध घेणेदेखील पोलिसांना शक्य होत नाही. त्यामुळे बहुतांश सायबर गुन्ह्यामध्ये मुख्य आरोपी पोलिसांच्या हाती लागत नाही, असे दिसून आले आहे.
- सायबर गुन्ह्या साठी ओएलएक्स वावर -
सायबर गुन्ह्यामध्ये चोरटे ओएलएक्स तसेच इतर अॅपचा वापर करतात. ते लष्कर अधिकारी यांच्या नावाने बनावट आयडी तयार करून नागरिकांचा विश्वास संपादन करतात. वाहन विकण्याचा बहाण्याने समोरील व्यक्तीचा विश्वास संपादन करून त्यांची आर्थिक फसवणूक केल्याचे प्रकार देखील समोर आले आहेत.
- नागरिकांनी स्वतः काळजी घेणं गरजेचं आहे -
कुठल्याही तिऱ्हाईत व्यक्तीचा फोन आल्यास त्याला आपल्या बँकेची गोपनीय माहिती, ओटीपी नंबर देऊ नये, कुठलीही बँक तुमच्याकडे तशी मागणी करत नसते. एखादा व्यक्ती तुम्हाला घाबरवून अथवा आमिष दाखवून तुमच्या बँकेची गोपनीय माहिती मागत असेल तर त्वरित सायबर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.