नाशिक - अॅपल कंपनीचे अधिकृत शोरूम फोडून लाखो रुपयांचे ८० आयफोन चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली आहे. शहरातील गंगापूर रोडवरील भरवस्तीतील व्यापारी संकुल परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी गंगापूर रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे संशयितांचा शोध घेत आहे.
हेही वाचा - बहिणीशी प्रेमसंबंधाच्या संशयावरून भावाने केली युवकाची हत्या; चौघांना अटक
या शोरूमचे शटर इलेक्ट्रिक आणि मजबूत असून सुद्धा चोरांनी ही धाडसी चोरी केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली. याच व्यापारी संकुलात सराफी दुकान, चारचाकी गाड्यांचे शोरूम, हॉस्पिटल असून येथे अनेक सुरक्षा रक्षक २४ तास तैनात असतात. या परिसरात अनेक सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसविले आहोत. एवढी सुरक्षेची खबरदारी घेतलेली असताना देखील चोरट्यांनी दुकान फोडून पोलिसांना एक प्रकारे आव्हानच दिले आहे.
हेही वाचा - धावत्या रेल्वेतून मोबाईल चोरणाऱ्या अट्टल गुन्हेगारास बेड्या; मनमाड लोहमार्ग पोलिसांची कारवाई
गेल्या पंधरा दिवसांपासून नाशिकमध्ये खून, बलात्कार, घरफोडी, चैन स्नॅचिंगच्या वाढत्या घटनेने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरातील कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेले पोलिसच लाच घेताना जाळ्यात सापडत असतील, तर पोलिसांकडून काय अपेक्षा करावी, असा प्रश्न सर्वसामान्य नागरीकांना विचारत आहे.