नाशिक - मालेगाव महानगरपालिकेतील अधिकाऱ्याच्या भरधाव कारने दुचाकीवरुन जाणाऱ्या मायलेकाला चिरडले. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर अधिकारी व त्यांच्या मित्रांनी घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, गावकऱ्यांनी त्यांच्या कारचा पाठलाग करुन त्यांना पकडले व पोलिसांच्या ताब्यात दिले. मालेगाव-सटाणा महामार्गावर सदर घटना घडली.
रोषण शिवाजी देवरे आणि शिलाबाई शिवाजी देवरे असे मृत मायलेकाचे नाव आहे. ते दोघेही दुचाकीने मालेगाव-सटाणा महामार्गाहून जात होते. कारचालक राजेंद्र खैरनार असे पालिकेच्या अधिकाऱ्याचे नाव आहे. ते स्वत: कार चालवत होते. राजेंद्र खैरनार व त्याचे दोन मित्र मालेगावकडे स्विफ्ट कारने जात होते. कारने रोशन देवरे या तरुणाच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. अपघातात रोशन आणि त्यांची आई शिलाबाई यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर अधिकारी व त्यांच्या मित्रांनी पळ काढला होता. मात्र, प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी पाठलाग करून तिघांना पकडले व पोलिसांच्या ताब्यात दिले. राजेंद्र खैरनार व त्याचे दोन मित्र दारू पिले असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी मालेगावच्या वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी कारचालक महानगरपालिकेत अतिक्रमण निर्मूलन विभागात विभाग प्रमुख पदावर कार्यरत आहे.