नाशिक- राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता. खबरदारी म्हणून नाशिक लाॅकडाऊन केले आहे. जिल्ह्यात कलम 144 लागू करण्यात आले आहे. मात्र, नागरिकांना कोरोनाचे तसेच प्रशासनाचेही भय राहिले नाही असेच दिसत आहे. प्रशासनाने आवाहन करुनही नागरिक घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने दुचाकीला दिवसाला शंभर रुपयांचे तर चारचाकी वाहनांसाठी हजार रुपयांचे इंधन भरता येईल, असे निर्बंध घातले आहेत. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी याबाबत आदेश जारी केले असून पेट्रोल पंप धारकांना त्याची अंमलबजावणी सक्तीची असणार आहे.
हेही वाचा- CORONA VIRUS : राज्यात संचारबंदी.. आता जिल्ह्यांच्या सीमाही बंद - मुख्यमंत्री
खबरदारीचा उपाय म्हणून पेट्रोल पंप चालकांची तातडीने बैठक घेण्यात आली. आता सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंतच जिल्ह्यात इंधन पुरवठा करण्यात येणार आहे. नाशिकमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण नसला तरी जिल्हा प्रशासन सतर्क आहे. लाॅकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी सर्व यंत्रणा काम करत आहे. संचारबंदी लागू असतानाही नागरिक याबाबत गांभीर्य नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सोमवारी संपूर्ण जिल्ह्यातील रस्त्यांवर नागरिकांनी गर्दी केली होती. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने कठोर पावले उचलले आहेत.