नाशिक - रेमेडेसिवीर इंजेक्शनच्या काळाबाजार प्रकरणी आणखी एका जणाकडून आडगाव पोलिसांनी 63 इंजेक्शन जप्त केले आहेत. काही दिवसांपूर्वी के. के. वाघ कॉलेज जवळ करण्यात आलेल्या कारवाईत आतापर्यंत नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यातील मुख्य सुत्रधारला पालघरमधून मंगळवारी ताब्यात घेण्यात आले आहे.
मागील आठवड्यात नाशिकच्या आडगाव शिवारातील के. के. वाघ कॉलेजजवळ तीन परिचारिका आणि एक मेडिकल बॉयला रेमेडेसिवीर इंजेक्शन चढ्या भावात विकत असताना पोलिसांनी रंगेहात अटक केली होती. अन्न व औषध प्रशासन विभाग आणि आडगाव पोलिसांनी ही कारवाई केली. या घटनेमध्ये आणखी काही जणांचा समावेश असल्याचा संशय पोलिसांना असल्याने पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला. आतापर्यंत आठ जणांना ताब्यात घेण्यात आले होते.
हेही वाचा - नाशिक जिल्ह्याला चक्रीवादळाचा तडाखा, 273 घरांची पडझड, फळबागांचे नुकसान
एकूण 85 इंजेक्शन जप्त -
मंगळवारी पालघर जिल्ह्यातून आणखी एका संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून तब्बल 63 इंजेक्शन जप्त करण्यात आले आहेत. संशयित आरोपी सिद्धेश पाटील हा बोईसर येथील कमला लाइफ सायन्स या रेमडेसिवीर इंजेक्शन तयार करणाऱ्या कंपनीत काम करत होता. तो कंपनीमधून रेमेडेसिवीर हे इंजेक्शन चोरून त्याची काळ्या बाजारात विक्री करत असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. आतापर्यंत या कारवाईत पोलिसांनी 1 लाख 89 हजार रुपयाचे एकूण 85 रजिस्टर इंजेक्शन जप्त केले आहेत. सिद्धेश पाटील याला दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्याची देखील माहिती पोलिसांनी दिली.
रेमडेसिवीर प्रकरणी महिलांना अटक केल्याची पहिलीच घटना -
राज्यात पहिल्यांदाच रेमेडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करत असताना महिलांच्या टोळीला नाशिकमधून अटक करण्यात आली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर रेमडेसिवीरचा काळाबाजार होत असल्याचे या प्रकारावरून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
हेही वाचा - नाशिक : बिटको रुग्णालयात शॉर्टसर्किटमुळे व्हेंटिलेटर पडले बंद, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही