सटाणा (नाशिक)- कांदा व डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी बागलाण तालुक्यातील नामपूर येथील बाजार समितीच्या आवारात रयत क्रांती शेतकरी संघटनेच्या वतीने उपोषण करण्यात येत आहे. योग्य तोडगा निघू न शकल्याने दुसऱ्या दिवशीही हे आंदोलन सुरूच आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार रयत क्रांती शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
रयत संघटनेचे दिपक पगार यांच्या प्रमुख नेतृत्वात हे उपोषण सुरू असून, कांद्याचे शेतकऱ्यांना रोख स्वरुपात पेमेंट मिळावे, जिल्ह्यातील अन्य मार्केट प्रमाणे कांद्याचे सरासरी दर असावेत, डाळिंब लिलावानंतर दोन टक्के पेमेंट कपात करू नये, आडतच्या नावाखाली अगाऊ रक्कम वसूल करणाऱ्या डाळिंब व्यापाऱ्यांवर कारवाई करावी, लिलावा नंतर ट्रॉलीत परत कांदे भरण्याच्या दरात समानता असावी, व्यापाऱ्यांनी खासगी वजनकाट्याचे दर कमी करावेत, अशा आंदोलकांच्या प्रमुख मागण्या आहेत. जायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक शिवचरण पांढरे, उपनिरीक्षक स्वप्निल कोळी यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.
यावेळी सभापती संजय भामरे, समितीचे संचालक अविनाश सावंत, विलास सावंत, डॉ. दिकपाल गिरासे आदींसह शेतकऱ्यांनी या आंदोलनास पाठिंबा दर्शवला आहे.
शेतकऱ्यांच्या अडचणीबाबत बाजार समिती प्रशासनाकडे वारंवार निवेदने देऊनही कोणतीही कार्यवाही होत नसल्याने रयत क्रांती संघटनेने लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे. शेतकऱ्यांच्या न्याय, हक्कासाठी खुद्द बाजार समितीच्या संचालकांनाच आंदोलन करण्याची वेळ आली आहे.