नाशिक - तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात कांदा लागवडीला वेग आला आहे. अवकाळी पाऊस आणि कांद्याला मिळालेल्या विक्रमी दरामुळे यावर्षी कांदा रोपांचे दरही गगनाला भिडले आहेत. सध्या, कांद्याचे बियाणे पंधराशे ते अठराशे रुपये प्रति किलो दराने विकले जात आहे.
यावर्षी परिसरात गहू, हरभरा या पिकांच्या पेरण्या वाढण्याची शक्यता आहे. पश्चिम पट्ट्यातील वटार, चौधाणे, वीरगाव, विंचुरे, कंधाणे, डोंगरेज, केरसाणे आदी गावांमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली जात आहे. यावर्षी खराब हवामान आणि परतीच्या पावसामुळे कांदा रोपांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.
हेही वाचा - कांदे स्वस्ताईकडे, प्रति क्विटंल तीन ते साडेतीन हजार रुपयांची घसरण
कळवण, सटाणा, देवळा तालुक्यातील मजूर वर्ग ऊस तोडणीसाठी बाहेरगावी गेला असल्याने परिसरात मजूरटंचाईदेखील निर्माण झाली आहे. यंदा, रोपांची वाढलेली किंमत, रोजंदारी, बियाणे आणि खते हा उत्पादन खर्चच मोठ्या प्रमाणावर होत असल्याने कांदा लागवड क्षेत्रावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.