नाशिक - केरळमधील हत्तीणीला फटाक्यांनी भरलेला अननस खाऊ घालून तिची अत्यंत क्रूरपणे हत्या केल्याच्या घटनेचा देशभर निषेध आणि संतापही व्यक्त केला जात आहे. नाशिकच्या पूजा बेलोकर हिने या माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनेचा रांगोळीतून निषेध नोंदवला आहे. तिने सहा तास अविरत परिश्रम घेत 6 फूट रुंद व 8 फूट लांबीची रांगोळी रेखाटून या अमानवी कृत्याचा निषेध केला.
काही दिवसांपूर्वी केरळमधील सायलंट व्हॅली याठिकाणी काही अज्ञातांनी एका गर्भवती हत्तीणीने फटाक्यांनी भरलेले अननस खाल्ल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली होती. पूजा हिने हत्तीणीचे चित्र रेखाटून ‘एका मुक्या आईच्या आक्रोशाचा न्याय जेव्हा निसर्ग करेल, तेव्हा तुमच्या गर्वाची मस्ती जिरवल्याशिवाय राहणार नाही..’ असा संताप व्यक्त करणारा संदेशही रांगोळीद्वारे दिला आहे. 48 चौरस फुटाची रांगोळी काढण्यासाठी पूजाला सुमारे सहा तासांचा वेळ लागला. या रांगोळीचे शिर्षक त्यांनी ‘अमानवी घटना’ असे दिले आहे. याबाबत रंगोलीकार पूजाने अधिक माहिती दिली आहे.
केरळमध्ये हत्तीणीच्या मृत्यूनंतर अवघा सोशल मीडिया गहिवरून आल्याचे बघायला मिळाले होते. सर्वच क्षेत्रांमधून या घटनेचा अत्यंत तीव्र अशा शब्दांत निषेध नोंदविला गेला. ज्यांनी हे कृत्य केले त्यांना भारतीय वन्यजीव संवर्धन कायद्यानुसार केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने कठोर शिक्षा द्यावी, अशी जोरदार मागणी सर्वच स्तरांमधून पुढे आली. केवळ पर्यावरणप्रेमी, निसर्ग व वन्यजीवप्रेमी नव्हेच तर प्रत्येक संवेदनशील मन या घटनेने हळहळले. ज्या निसर्गाने केरळला भरभरून दिले, त्या राज्यातील एका गावात अशी घटना घडणे हे अत्यंत दुर्दैवी असल्याचे मत सर्व स्तरावरील नागरिकांनी व्यक्त केले आहे. याच पार्श्वभूमीवर पूजा बेलोकर हिने गर्भवती हत्तीणीच्या हत्येचा निषेध आपल्या कलेमधून मधून केला आहे.