नाशिक: येथील श्री काळाराम मंदिर हे हेमाडपंथी बांधकाम असलेले प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर येथील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. देशभरातील भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. प्रभू राम, लक्ष्मण आणि सीता मातेची प्राचीन मूर्तीदेखील येथे आहे. मंदिर प्रशासनाकडून गुढीपाडव्यापासून वासंतिक नवरात्र महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या ठिकाणी प्रसिध्द कलाकार येऊन विविध धार्मिक कार्यक्रम सादर करतात. व्याख्यान, गीतरामायण, तुळशी अर्चन, सप्तमी, महाप्रसाद, श्रीराम नवमी जन्मोत्सव, अन्नकोट श्री राम याग, श्रीराम पठण अभंगवाणी, भरत नाट्यम, स्वरधारा असे विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. येत्या 2 एप्रिल रोजी भागवत एकादशीच्या दिवशी रामरथ आणि गरुड रथ यात्रा सालाबादप्रमाणे निघणार आहेत. ह्या सोहळ्याला देखील भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते.
पेशवेकालीन मंदिर: श्री काळाराम मंदिर आहे त्या मंदिराच्या ठिकाणी श्रीरामांची ‘पर्णकुटी’ होती. राम सव्वा दोन वर्षे पंचवटीत वास्तव्याला होते. या स्थानाला वैष्णवांच्या दृष्टीने फार महत्त्व आहे. ओढा नाशिकरोड येथील जहागिरी असलेले पेशव्यांचे सरदार रंगनाथ ओढेकर यांना माधवराव पेशव्यांच्या मातोश्री गोपिकाबाई यांनी मंदिराचे बांधकाम करण्याची आज्ञा केली होती. याच काळात ओढेकर यांना 'मंदिराचा जीर्णोद्धार करावा’ असा श्रीरामांचा स्वप्नदृष्टांत झाल्याची आख्यायिका आहे. काळाराम मंदिर असलेल्या ठिकाणी पूर्वी लाकडी मंदिर होते. समर्थ रामदास स्वामींनी याच मंदिरात रामाची उपासना केली होती. मंदिरातील मूर्ती काही शतकांपूर्वी नाशिकमधील गोदावरी नदीच्या रामकुंडात मिळालेल्या आहेत. या मूर्ती वालुकामय आहेत. मंदिराच्या बांधकामासाठी नाशिकपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या ‘रामशेज’ नावाच्या डोंगरावरून दगड आणण्यात आले.
'या' डोंगरावर श्रीराम करायचे निद्रा: या डोंगरावर भगवान श्रीराम रात्री निद्रा करण्यासाठी जात, असेही बोलले जाते. या डोंगरावरील दगड काढल्यानंतर दूध आणि नवसागर टाकून उकळून त्याचे परीक्षण केले गेले. पूर्ण बांधकाम या दगडांपासून झाले आहे. 1778 ते 1790 या कालखंडात मंदिर पूर्ण झाले आहे. त्यावेळेस या मंदिराच्या बांधकामाला 23 लाख रु. खर्च आला होता. दरवर्षी देशभरातून हजारो पर्यटक या मंदिरात दर्शनासाठी येत असतात.