नाशिक - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे ड्रिम प्रोजेक्ट असलेले नाशिकचे बोटॅनिकल गार्डन सध्या टवाळखोरांचा अड्डा झाले आहे. या टवाळखोरांचा बंदोबस्तकरून नाशिकच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या वास्तूंचे जतन करा, अन्यथा खळ्ळखट्याकला समोर जा, असा इशारा मनसेने दिला आहे.
नाशिक महानगरपालिकेमध्ये मनसेची सत्ता असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून बोटॅनिकल गार्डन प्रकल्प पूर्ण करण्यात आला. महानगरपालिकेवर कोणताही आर्थिक बोजा न पडू देता देशातील नामवंत उद्योगपती रतन टाटा यांच्या मदतीने सीएसआर फंडातून राज ठाकरे यांनी हा प्रकल्प उभा केला होता. दुर्मिळ वनौषधींची लागवड, आकर्षक सिट आउट्स, वन्य प्राण्यांचे हुबेहुब पुतळे, फळे, फुले, जंगली प्राण्यांची सखोल माहिती आणि सर्वात महत्वाचे म्हणजे झाडांचे आत्मचरित्र सांगणारा लेझर शो हे या गार्डनची वैशिष्ट्ये आहेत. नाशिकसह बाहेरील पर्यटक याठिकाणी येतात.
मनसेची नाशिकमधील सत्ता गेल्यानंतर अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि निसर्गाची सांगड घालणाऱ्या या बॉटनिकल गार्डनची दुरावस्था झाली आहे. परिसरातील टवाळखोर आणि मध्यपींचा अड्डा सध्या हे गार्डन बनले आहे. या टवाळखोरांची मजल पर्यटक आणि सुरक्षारक्षकांना धमकावण्यापर्यंत जाऊन पोहोचली आहे. त्याबाबत अनेक तक्रारीदेखील समोर आल्या आहेत. महानगरपालिका कोट्यवधी रुपये खर्चून शहराला स्मार्ट करण्याचा प्रयत्न करत असताना अगोदरच उभारलेल्या प्रकल्पांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष दिलीप दातिर यांनी असा आरोप पालिका प्रशासनावर केला आहे.
हे गार्डन तयार झाल्यानंतर महानगरपालिकेने या उद्यानाचे सगळे नियोजन, देखरेख आणि जमाखर्च वनविभागाकडे सुपुर्द केला होता. मात्र, महापालिका हद्दीत उभारण्यात आलेल्या एवढ्या सुंदर वास्तुकडे महापालिका अक्षम्य दुर्लक्ष करत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. वनविभागानेच आता याठिकाणी अधिक सुरक्षारक्षक नेमण्याची मागणी महापालिकेकडे केली आहे.