मनमाड (नाशिक) - भारतीय रेल्वेत मोठ्या प्रमाणावर खासगीकरण सुरू आहे. अनेक स्थानके, कारखाने खासगी उद्योगाला देण्याचा धडाका सरकारतर्फे सुरु आहे. या खासगीकरणाच्या विरोधात आज (दि. 24 सप्टें.) केंद्रीय इंजिनिअर कारखाना मनमाड येथे ऑल इंडिया एससी-एसटी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन कारखाना शाखातर्फे विरोध प्रदर्शन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी कारखाना शाखाचे सिद्धार्थ जोगदंड, एनआरएमयूचे सचिव प्रविण बागुल, सीआरएमएसचे कारखाना शाखाध्यक्ष प्रकाश बोडके, ऑल इंडिया ओबिसी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखानाचे अध्यक्ष संजय दीक्षित यांसह आदींची भाषणे झाली. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. विरोध प्रदर्शन झाल्यावर प्रधानमंत्री व रेल्वे मंत्री यांना विभागामार्फत निवेदन पाठविण्यात आले.
या आहेत मागण्या
- रेल्वेचे खासगीकरण, निगमीकरण त्वरित थांबवावे
- पदोन्नतीतील आरक्षण कायम करण्यात यावे
- निजी व न्यायिक क्ष्रेत्रात आरक्षण देण्यात यावे
- पुणे कराराअन्वये जी आरक्षण व्यवस्था लागू झाली आहे ती कायम झाली नाही तर पुणे करारातील अटी रद्द करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जे अधिकार मिळविले होते ते बहाल करण्यात यावे.
- यांसह इतर मागण्या करण्यात आल्या
हेही वाचा - रुग्णवाहिकेतून रुग्ण नाही तर ऑक्सिजन सिलिंडरची वाहतूक!