नाशिक- केंद्र व राज्य सरकारच्या अपयशामुळे दिवसेंदिवस वाढत असलेल्या बेरोजगारीच्या विरोधात आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकरत्यांनी नाशिक रोड येथील रेल्वे स्थानकावर सरकारचा निषेध केला. 'जॉब दो जवाब दो, फडणवीस सरकारी जॉब दो' अशी नारेबाजी करत कार्यकर्त्यांनी रेल्वे स्थानकात प्रवेश करून, मनमाड -भुसावळ रेल्वे रोखली व सरकारच्या युवक विरोधी धोरणांचा विरोध केला.
सरकारच्या नियोजनशून्य व निष्क्रिय धोरणामुळे सव्वा कोटीहून अधिक लोक बेरोजगार झालेत. सरकारी संशोधन व सर्वेक्षण संस्थानुसार नवे रोजगार तयार करण्यात सरकारला अपयश आले असून बेरोजगारीने नवे उच्चांके गाठली आहेत. युवकांना दरवर्षी दोन कोटी रोजगार देऊ अशी घोषणा पंतप्रधानांनी केली होती. मात्र, सरकारच्या अपयशी धोरणांमुळे जनतेवर रोजगार गमावण्याची वेळ आले आहे. सरकारने हे अपयश मान्य करून उपाययोजना करण्याऐवजी त्यांनी खोटी आकडेवारी जनतेच्या तोंडावर फेकायला सुरुवात केली असल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केला आहे.
दुष्काळी परिस्थितीत शेतकरी मुलांच्या पदरात नापीकी पडली असतांना, सरकारने शेतकरी मुलांसाठी दुसऱ्या क्षेत्रातही रोजगार ठेवला नाही. मोठ्या उद्योगपतींचे कर्ज माफ करणाऱ्या या सरकारने मेक इन इंडिया, मेकिंग महाराष्ट्र, स्टार्ट अप इंडिया, प्रधानमंत्री युवा योजना, अशा योजनांची मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी केली होती. परंतु सरकार ने यावर ठोस पावले उचलली नाहीत. हे सरकार धर्माच्या नावाखाली फक्त राजकारण करत असून राजकीय पोळी भाजण्यासाठी बेरोजगार तरुणांचा वापर करत आहे. सरकारने अभ्यास करून उत्तरे देण्याच्या भूमिकेपलीकडे काहीही केले नाही. शिक्षण घेऊनही हाताला रोजगार नसल्यामुळे अनेक तरुण गुन्हेगारीकडे वळत असल्याचा आरोप करत राष्ट्रीय युवक काँग्रेसने रेल्वे रोको आंदोलन करून सरकारचा निषेध नोंदवला आहे.
या आंदोलनात राष्ट्रीय युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, शहराध्यक्ष अंबादास खैरे, पुरुषोत्तम अडलक, दिंडोरी लोकसभा जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, सचिन पिंगळे, योगेश निसाळ, धीरज बच्छाव, सुनील कोथमिरे, विजय जाधव, डॉ संदीप चव्हाण ,शाम हिरे, हिमांशू चव्हाण, रेहान शेख, रवी बस्ते, सायरा शेख, संदिप डेरे, प्रमोद सांगळे, अक्षय भोसले, सोनू वाईकर आदींसह कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.