नाशिकमधील आरोग्य यंत्रणा हतबल; बेडसाठी रुग्णालयांच्या दारात याचना करण्याची रुग्णांवर वेळ - नाशिक लेटेस्ट कोरोनाबाधित बेड आवश्यकता
गेल्या वर्षभरापासून राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. शासन, प्रशासन आणि आरोग्य विभागाने अथक प्रयत्न करुन कोरोना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यात त्यांना यशही आले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणांवरील ताण पुन्हा वाढला आहे.
नाशिक - कोरोना प्रादुर्भावामुळे नाशिकमध्ये दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत आहे. वैद्यकीय यंत्रणा हतबल झाली आहे. अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन आणि बेडचा तुटवडा असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. मनपाच्या झाकीर हुसेन रुग्णालयासमोर 30 ते 35 रुग्ण बेडच्या प्रतिक्षेत असल्याचे चित्र आहे. यामुळे रुग्ण आणि नातेवाईक हवालदिल झाले आहेत.
ऑक्सिजन अभावी खासगी रुग्णालयात घेत नाहीत -
नाशिक शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने रुग्णांना उपचारासाठी बेड्स मिळत नसल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासून समोर येत आहे. यातच ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होत असल्याने खासगी रुग्णालये देखील रुग्णांना दाखल करून घेण्यास नकार देत आहेत. परिणामी आज (गुरुवारी) नाशिक महानगरपालिकेच्या डॉक्टर झाकीर हुसेन रुग्णालयासमोर 30 ते 35 रुग्ण बेडच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसले. खासगी रुग्णालयामध्ये बेड्स उपलब्ध होत नसल्याने सरकारी रुग्णालयात तरी किमान सोय होईल, या आशेने बाधित रूग्ण आणि त्यांचे नातेवाईक रुग्णालयांच्या आवारात गर्दी करत आहेत.
रूग्ण आणि नातेवाईक हवालदिल -
खासगी रुग्णालयांमध्ये निर्माण होत असलेला ऑक्सिजन व्हेंटिलेटर बेडचा तुटवडा आणि डॉक्टरांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या घटना वाढल्याने खासगी रुग्णालयात रुग्णांना दाखल करून घेतले जात नाही. बेड मिळावा म्हणून पालिकेच्या रुग्णालयांकडे नागरिक येतात. त्यामुळे पालिकेच्या रुग्णालयांवर प्रचंड ताण वाढला आहे. वाढत्या कोरोना प्रादुर्भवासमोर प्रशासनाच्या सोयी सुविधा तोकड्या पडत असल्याने वैद्यकीय यंत्रणे पाठोपाठ रुग्ण आणि त्यांचे नातेवाईकही हवालदिल झाले आहेत.
ऑक्सिजन बेडविना दोघांचा मृत्यू -
नाशिक रोडयेथील कोविड सेंटर बाहेर ऑक्सिजन बेड मिळवा यासाठी दोन ते तीन तास प्रतीक्षा करावी लागते. मात्र, त्यानंतरही बेड मिळत नाही. वेळेवर ऑक्सिजन बेड न मिळाल्यामुळे एका कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेला काही तास उलटत नाही, तोच नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या समोर तीन तास बेड मिळण्यासाठी धडपड करणाऱ्या महिलेचा मृत्यू झाला. एकूणच नाशिकमध्ये व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन बेडची कमतरता आहे.
जिल्ह्यात सद्यस्थितीत ४४ हजार ५८० रुग्णांवर उपचार सुरू -
आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण २ लाख ६८ हजार २०८ कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत ४४ हजार ५८० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये १ हजार ८९४ने घट झाली आहे. आत्तापर्यंत ३ हजार ४१९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
हेही वाचा - इथं ओशाळली माणुसकी.. अपशकुनी ठरवून आई-वडीलांनीच केला ११ वर्षीय मुलीचा छळ, अखेर मृत्यू