नाशिक - मध्ये मुलांच्या बुद्धी संवर्धनासाठी आयोजित कोड्यांच्या प्रदर्शनाला मंगळवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 'वर्ल्ड ऑफ पझल्स' या अनोख्या प्रदर्शनात १५० हुन अधिक विविध प्रकारची कोडी सोडवण्याची स्पर्धा घेण्यात आली.
इंटरनेट, सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे एका क्लिकवर संपूर्ण जगातील माहिती उपलब्ध होते. मात्र, याचा परिणाम बौद्धिक गुणवत्ता वाढीवर होत असतो. विभक्त कुटुंबपद्धतीमुळे छोट्याशा कुटुंबामध्ये आई वडील कामावर गेल्यानंतर मुले जास्तीत जास्त मोबाईल आणि टीव्ही बघणे पसंत करतात. त्यामुळे त्यांच्या बौद्धिक गुणवत्तेच्या वाढीवर देखील परिणाम होत असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे.
हेही वाचा - दिंडोरीत अचानक आलेल्या धुक्याच्या लाटेने द्राक्ष बागायतदार धास्तावले
याच पार्श्वभूमीवर बुद्धी संवर्धन कोड्यांचे प्रदर्शन नाशिक गंगापूर रोड येथे आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनात सांकेतिक, शाब्दिक, जागेचा अंदाज, चित्रमय कोडी असे सुमारे १५० हून अधिक कोड्यांचे प्रकार ठेवण्यात आले होते. ही आव्हानात्मक कोडी सोडवण्यासाठी चिमुरडे, तरुण, युवक-युवती महिलांनी सहभाग घेतला. ह्यावेळी बच्चे कंपनी सर्व काही विसरून कोडी सोडवण्यात रममाण झाले होते. जास्त कोडी सोडवणाऱ्या स्पर्धकांना आयोजकांच्या वतीने पारितोषिकही देण्यात आले. तसेच या प्रदर्शनात विविध कोड्यांबाबतच्या पुस्तकांचे प्रदर्शनही ठेवण्यात आले होते.
या कोडे प्रदर्शनाच्या कार्यक्रमाचे आयोजन यशोधरा वेल्हाणकर, शिल्पा जांभळे, रवींद्र नाईक यांनी केले होते.
हेही वाचा - बांधकाम ठेकेदाराची गळफास घेऊन आत्महत्या