नाशिक: येत्या दोन दिवसांवर बुद्ध पौर्णिमा आली असून नाशिक शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. याच अनुषंगाने भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि बीएमए ग्रुप यांच्याकडून नाशिक शहरातून हजारो बांधवांसह 100 बुद्धमूर्तींची मिरवणूक काढण्यात आली. यात प्रत्येक गावातील पाच उपासकांनी श्रामणेर शिबीरात सहभाग घेतला. त्यानुसार यंदा जिल्ह्यातून एकूण पाचशेहून अधिक उपासक श्रामणेर झाले. या शंभर गावांना बुद्ध मूर्ती प्रदान करण्यात आली. या साडे पाच फूट उंचीच्या मूर्ती त्या प्रत्येक गावातील बुद्ध विहारात दान करण्यात आल्या. तत्पूर्वी नाशिक शहरातील विविध भागातील भव्य रथ मिरवणूक काढण्यात आली.
शंभर बुद्धमूर्तींची मिरवणूक: बुद्ध पौर्णिमा हा दिवस भगवान गौतम बुद्ध यांची जयंती म्हणून साजरा केला जातो. भगवान गौतम बुद्ध यांना बौद्ध धर्माचे संस्थापक मानले जाते. यावेळी जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील शंभर गावांमधील 500 श्रामनेर आणि हजारो नागरिक सहभाग झाले होते. सम्राट अशोक जयंती, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि बुद्ध पौर्णिमा निमित्त 23 एप्रिल ते दोन मे दरम्यान जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये श्रामनेर शिबीर घेण्यात आले. या शिबीरांत शंभर गावातील प्रत्येकी पाच उपासक श्रामनेर झाल्यास सुमारे 500 श्रामणेरांचे प्रथमच अशा प्रकारे प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले.
100 रथांची भव्य मिरवणूक: 100 बुद्ध मूर्तींची रंगीबेरंगी फुलांनी व निळ्या झेंड्यांनी सजवलेल्या छोटा हत्ती वाहन म्हणजेच 100 रथांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. तपोवनातून भगवान गौतम बुध्द आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषात या मिरवणुकीस प्रारंभ झाला. त्यानंतर ही मिरवणूक जुना आडगाव नाका, द्वारका, मुंबई नाका, गडकरी चौक, त्र्यंबक नाका, सीबीएस मार्गे गोल्फ क्लब येथे आली. दरम्यान, ठिकठिकाणी मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले. तसेच अनेक भीम गीते आणि बौध्द गीते यांनी परिसर दणाणून गेले होते. या सर्व मूर्त्यांचे जिल्ह्यातील 100 गावात प्रतिष्ठापना केली जाणार आहे.
हेही वाचा: बुद्ध पौर्णिमा विशेष बुद्धांचे तत्वज्ञान शिकवणारा ऐतिहासिक लेण्यांचा वारसा