नाशिक - करोना विषाणूविरुद्ध लढण्यासाठी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांनी दोन लाख 78 हजाराचा निधी दिला आहे. कारागृह अधीक्षक प्रमोद वाघ आणि वरिष्ठ अधिकारी अशोक कारकर यांनी या निधाचा धनादेश जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे आज सुपूर्द केला.
नाशिकरोड कारागृहात तीन हजार बंदी आहेत. त्यामध्ये पक्के कैदी म्हणजे कोर्टाने शिक्षा ठोठावलेले आणि कच्चे कैदी म्हणजे ज्यांची कोर्टात सुनावणी सुरू आहे, अशांचा समावेश आहे. पक्क्या कैद्यांना कायद्यानुसार काम द्यावे लागते. नाशिकरोड कारागृहात त्यासाठी दहा कारखाने आहेत. त्यामध्ये सुतार, लोहार, वीणकाम, मूर्तीकाम, रसायन, बेकरी आदी कारखान्यांचा समावेश आहे. तसेच शेती देखील आहे. तेथे पक्के कैदी काम करतात. त्यांना पगार दिला जातो. तो कारागृह प्रशासनाकडे सुरक्षित ठेवला जातो. शिक्षा संपल्यावर किंवा गरजेच्या वेळी हा पगार कैद्यांना दिला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करोना विषाणूच्या संकटाला तोंड देण्यासाठी विविध संस्था, उद्योग, व्यक्तींना देणगीचे आवाहन केले आहे. त्याला प्रतिसाद म्हणून अधीक्षक प्रमोद वाघ आणि अशोक कारकर यांनी कैद्यांना मदतीचे आवाहन केले. त्याला कैद्यांनी तत्काळ प्रतिसाद दिला. आपल्या पगारातील शंभरापासून हजारापर्यंतची रक्कम कैद्यांनी सरकारला देण्याचे ठरवले. त्यानुसार दोन लाख 78 हजाराचा निधी जमा झाला. तो जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला. या आधी केरळच्या पूरग्रस्तांना दोन लाखावर निधी दिला होता. कारागृह कर्मचारी व अधिकारीही आपला एक दिवसाचा पगार शासनाला देणार असल्याचे प्रमोद वाघ यांनी सांगितले.