नाशिक : नाशिक, मुंबई, पुणे महामार्ग जणू मृत्यूचा सापळा बनला आहे. अनेक ठिकाणी मोठंमोठे खड्डे पडलेले असतानाही याकडे रस्ते विभाग अजिबात लक्ष देताना दिसत नाही. या खड्ड्यांमुळे अनेकांचा बळी गेले. त्या पार्श्वभूमीवर प्रहार संघटनेच्या वतीने गुरुवारी या विरोधात आंदोलन करत संबंधित अधिकाऱ्यांना डांबर भेट देत निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरासह जिल्हाभरातील रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अवघ्या काही दिवसांच्या पावसामुळे नाशिक, मुंबई, पुणे, महामार्ग या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले. त्यामुळे, हा खड्डेमय झालेला महामार्ग वाहतूकदारांच्या अपघातास कारणीभूत ठरत आहे. याठिकाणी वारंवार होत असलेल्या अपघात आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेता गुरुवारी प्रहार संघटनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊन त्यांना डांबर भेट देत हे रस्ते लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावे, अशी मागणी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली. येत्या आठ दिवसात रस्त्यांची डागडुजी झाली नाही तर तीव्र स्वरुपाचे आंदोलन करू असा इशाराही प्रहार संघटनेने यावेळी दिला आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे जिल्हाभरातील रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. परिणामी अपघातांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. दरम्यान आता याविरोधात प्रहार संघटना आक्रमक झाली असून महामार्गावरील खड्डे आठ दिवसात बुजवण्यात यावे, अन्यथा आंदोलन करू असा इशारा संघटनेच्यावतीने संबंधित विभागाला देण्यात आला आहे. या आंदोलनांनतर आतातरी हे खड्डे बुजवले जातील अशी अपेक्षा सर्वांकडूनच व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा - मादी बिबट्याने घरातील 'त्या' चार बछड्यांचे केलं स्थलांतर