नाशिक - केंद्रीय राज्यमंत्री रतनलाल कटारिया यांनी शेतकऱ्यांविरोधात केलेल्या विधानावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्याविरोधात प्रहार संघटनेने त्यांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध व्यक्त केला.
केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्यावरून दिल्ली, हरियाणा येथे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. राज्यातही विविध राजकिय पक्ष व शेतकरी संघटनांनी रस्त्यावर उतरून या आंदोलनाला पाठींबा दिला आहे. त्यात केंद्रीय राज्यमंत्री रतनलाल कटारिया यांनी या आंदोलनकारी शेकऱ्यांविरोधात आक्षेपार्ह्य विधान केले. शेतकऱ्यांनी आंदोलन केल्यापेक्षा कुठेतरी जाऊन मरावे, असे वक्तव्य त्यांनी केले होते. या विरोधात प्रहार संघटनेने आक्रमक पवित्रा घेत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन केले. कटारिया यांना हे विधान महागात पडेल, असा इशाराही प्रहारने दिला. यावेळी मोदी सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.
काय म्हणाले होते कटारिया -
हरियाणामधील अंबाला येथे रेल्वे पूलाचे भूमिपूजन करण्याकरिता आलेले केंद्रीय राज्य मंत्री रतनलाल कटारिया यांना शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवले. त्यामुळे संतापलेल्या कटारिया यांनी जर शेतकऱ्यांना विरोधच करायचा आहे आणि काळे झेंडेच दाखवायचे आहेत, तर त्यांनी दुसरीकडे जावून मरावे, असे वादग्रस्त विधान केले.
हेही वाचा - स्वाभिमानी करणार रात्रभर आत्मक्लेश जागर आंदोलन; शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा