नाशिक - आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास नवीन नाशिकच्या वावरे नगरमधील मुख्य रस्त्यावरची ११ हजार किलोवॅटची विद्युत तार तुटल्याची दुर्घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी एका रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या घटनेमुळे या भागातील वीजपुरवठा पाच तास खंडित झाला होता.
जुनी केबल बदलण्याची स्थानिकांची मागणी -
सकाळी 9 वाजेच्या सुमारास महावितरणाची एकलहरेहून थेट सातपूर या औद्योगिक वसाहतीत विद्युत पुरवठा करणारी ११ हजार किलोवॅटची विद्युत तार अचानक तुटली. या वेळेस या परिसरात फारशी गर्दी नव्हती, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र, ही वायर खाली उभ्या असलेली रिक्षा (एमएच १५ एफयु ३२८९) वर पडल्यामुळे या रिक्षाचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, हा प्रकार येथे उपस्थित प्रदीप पेशकर आणि अशोक पवार यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला. तसेच याची माहिती विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. यावेळी जुन्या झालेल्या विद्युत तारांचे मेंटेनन्स करून वेळोवेळी बदलल्या गेल्या पाहिजे, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात आली.
हेही वाचा - मोक्का कोर्टाचे आदेश आल्यानंतरच एनसीबीला मिळणार इकबाल कासकरचा ताबा