नाशिक : स्वातंत्र्यवीर सावरकरांची 28 मे रोजी जयंती आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाची आहुती देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांची यादीत विनायक दामोदर सावरकर या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी नाशिकच्या अभिनव भारत मंदिरात विचार विनिमय केला जायचा.अनेक स्वातंत्र्यसेनानींनी देशासाठी बलिदान देण्याची तयारी याच मंदिरातून केली आहे. अशा ऐतिहासिक अभिनव भारत मंदिराची परिस्थिती बिकट झाली आहे. अगदी दरवाज्याच्या कडीपासून तर मधल्या सभागृहापर्यंत सर्वच ठिकाणीच्या वस्तू शेवटच्या घटका मोजत आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांची देवता असलेली मूर्ती धूळखात पडलेली असून दरवाजे तुटलेल्या अवस्थेत आणि खिडक्यांच्या काचा फुटलेल्या आहेत.
लोकवर्गणीतून मिळाला वाडा: नाशिकच्या तीळभांडेश्वर लेनमधील अभिनव भारत संस्थेचे कार्यालय असलेला हा वाडा आजही इतिहासाची साक्ष देतो. मात्र स्वातंत्र्यानंतर हा वाडा मिळवण्यासाठी अनेकांना भांडावे लागले. शेवटी लोक वर्गणी गोळा करून हा वाडा मिळवला. यासाठी शासनाकडून कुठलीही मदत न घेता लोकांकडून पैसे घेऊन वाडा मिळवला होता. यामध्ये महाबळ गुरूजी, केतकर, दातार, वर्तक, भट यासारख्या धुरिणांनी निधी संकलन केले. तर स्वा. सावरकर यांनी ठिकठिकणी व्याख्याने दिली. त्यातून मिळालेला निधीही त्यांनी या वाड्याच्या खरेदीसाठी दिल्याचे सावरकर प्रेमी सांगतात.
नाशिकमधील अभिनव भारत मंदिरासाठी राज्य सरकारने सहा कोटी रुपये निधी मंजूर केला. हा वाडा सद्यःस्थितीला अत्यंत मोडकळीस आलेला आहे. मंदिराच्या नूतनीकरणाची घोषणा केली, मात्र पाच वर्ष उलटूनसुद्धा अभिनव भारत मंदिराचा कायापालट तर सोडा, पण साधा आराखडा सुद्धा तयार झाला नाही. - माजी नगरसेवक शाहू खैरे
सावरकरांच्या नावावर फक्त राजकारण: या मंदिरात ज्या स्वातंत्र्य सेनानींचे फोटो होते ते अक्षरशः जीर्ण अवस्थेत आढळून येत आहेत. एवढेच नाही तर मंदिरात असलेल्या फरशा उखडलेल्या अवस्थेत दिसून येत आहेत. सावरकर प्रेमी, भाजप, शिंदे गटाने सावरकर गौरव यात्रा काढण्याऐवजी अशा पुरातन वास्तूंचे जतन करणे नाशिककरांना अपेक्षित आहे. सावरकरांच्या नावावर केवळ राजकारण केले जात आहे. या ऐतिहासिक अभिनव भारतची वास्तू जपण्यासाठी राज्यकर्ते दुर्लक्ष करत असल्याचे काँग्रेसचे माजी नगरसेवक शाहू खैरे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा -