नाशिक - बागलाण तालुक्यातील साल्हेर किल्ल्यावर हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांवर जायखेडा पोलिसांनी कारवाई केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साल्हेर ग्रामपंचायत प्रशासनाने किल्ल्यावर पर्यटनास बंदी घातली आहे. मात्र, तरीही काही बेजाबदार पर्यटक नजर चुकवून किल्ल्यावर गेले होते.
छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या साल्हेर किल्ल्याचा परिसर पावसामुळे हिरवाईने नटला आहे. दरवर्षी अनेक हौशी पर्यटक आणि गिर्यारोहक ट्रेकिंगसाठी या किल्ल्यावर येतात. यावर्षी मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर किल्ल्यावर येण्यास बंदी घालण्यात आली आहे. तरीही गेल्या 15 दिवसांपासून शासनाचे सर्व नियम पायदळी तुडवत दररोज किमान दोन हजार तरुण-तरुणी ट्रेकिंगनिमित्त किल्ल्यावर येत आहेत. तसेच सध्या पावसामुळे किल्ल्याच्या मागील व पुढीलबाजूच्या पायऱ्यांवर शेवाळ तयार झाले असून पर्यटक स्वत: चा जीव धोक्यात घालून चढउतार करत आहेत. ग्रामपंचायत प्रशासनाच्या तक्रारीवरून सध्या पोलिसांनी अशा पर्यटकांवर धडक कारवाई सुरू केली आहे.
किल्ल्यावर होणाऱ्या गर्दीमुळे कोरोना संसर्गाचा धोका निर्माण झाला असून पर्यटकांनी फेकलेल्या कचऱ्यामुळे घाणीचे साम्राज्य देखील पसरले आहे. अनेक तरुण किल्ल्यावर मुक्कामी राहत असल्याने किल्ल्यावरील गुहांमध्ये सर्रास मद्यपान आणि अश्लील प्रकार घडत आहेत. त्यामुळे काही अश्लील वस्तू, दारूच्या बाटल्या, सिगारेट्सची अर्धवट जळालेली थोटकं किल्ल्याच्या परिसरात आढळत आहेत.
साल्हेर किल्लावर येणाऱ्या पर्यटकांमध्ये पुणे, मुंबई, अहमदनगर, धुळे, पिंपळनेर, साक्री यासह गुजरात राज्यातील तरुणांचा सर्वाधिक समावेश आहे. जिल्हाबंदी असल्याने पुणे-मुंबईकडील पर्यटक दिंडोरी-पुनंद-मानुरकडून तर साक्री-धुळ्याकडील पर्यटक मुख्य रस्त्याऐवजी चिवटीबारीमार्गे साल्हेरला पोहोचत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस व ग्रामपंचायत प्रशासनाने आता कडक पावले उचलली आहेत.