सटाणा (नाशिक) - बागलाण तालुक्यातील जायखेडा येथील विकास शेवाळे कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. विकास शेवाळे हे मुंबईत पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असताना त्यांना कोरोनाची लागण झाली होती. १५ दिवसांच्या उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.
विकास शेवाळे यांनी “फानूस बनके जिसकी, हिफाजत हवा करे; शमा क्या बुझे, जिसे रोशन खुदा करे!” शायर मचली शहरी यांच्या या ओळी शब्दश: सार्थ ठरविल्या आहेत. विकास शेवाळे यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी १५ दिवस कोरोनाशी चिवट झुंज देऊन, कोरोनावर मात करून विजयी मुद्रेने रुग्णालयाबाहेर पाउल ठेवले. यावेळी सर्व डॉक्टर्स आणि उपचार करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी तसेच कॉलनीतील नागरिकांनी त्यांचे फुलांचा वर्षाव, टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.
विकास आत्माराम शेवाळे हे मुंबई येथे पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. कर्तव्यावर असतांना त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यांचा पहिला रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या पत्नीचेही रिपोर्ट पहिल्या अहवालात पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाल्याने सहाजिकच कुटुंबियांची अस्वस्थता वाढली. मात्र या योध्याने तीव्र इच्छाशक्ती सकारात्मकता व काळीज घेत पंधरा दिवसांच्या उपचारानंतर कोरोनाला हरवीत घरी परतले. या दरम्यान त्यांची तब्येत पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अहवालांच्या दोन टोकांमध्ये हेलकावे खात होती. या दरम्यान विकास शेवाळे यांच्या तीन ते चार चाचण्या झाल्या. डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरू असतांना कुठेतरी आशेचा किरण दिसला आणि पुन्हा आशा उंचावली. पुन्हा डॉक्टरांनी निरीक्षणाखाली ठेवले.
सर्व तपासण्या आणि चाचण्यांचे अहवाल समाधानकारक आल्यानंतरच मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयातील कोविड - १९ उपचार पथकाने पूर्ण बरे झाल्यानंतर त्यांना निरोप दिला. शेवाळे हे सध्या १४ दिवस घरातच क्वारंटाईन राहतील. त्यांनी दिलेली कोरोना विरुद्धची झुंज व जिद्द वाखाणण्यासारखीच आहे. डॉक्टरांनीही जिद्दीने उपचारांची शर्थ केली आणि त्यांना कोरोनाच्या जबड्यातून बाहेर काढल्याने यांचे कौतुक होत आहे.
कुटुंबातील सर्वांचे फोन येतात. हे कर, ते कर म्हणून सारखी काळजी करतात. सुरुवातीला आई खूप चिंता करायची. परंतु, तिला काळजी घेत असल्याबाबतचा विश्वास दिला. आता आई मला जनतेची सेवा कर”, असा सल्ला देतेय. ही बाब मला लढण्याची बळ देणार आहे, अशी भावना मुंबई येथे सेवेत असलेले पोलीस उपनिरीक्षक विकास शेवाळे व्यक्त करतात. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी काही दिवस विश्रांती घेऊन पुन्हा लवकरच जनतेच्या सेवेत दाखल होणार असल्याचे विकास शेवाळे यांनी दूरध्वनी वरून सांगितले.
काळजी घ्या -
“कोरोना म्हणजे घाबरण्यासारखा आजार नक्कीच नाही; मात्र तो एकामुळे दुसऱ्याला होतो, म्हणूनच सर्वजण घाबरलेले आहेत. परंतु हलक्यातही घेण्याचा गैरसमज कुणी करू नये. अशा परिस्थितीत प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. पोलीस, डॉक्टर, नर्स, सफाई कामगार, पत्रकार, सर्वचजन तुमची काळजी घेण्यासाठी कोरोनाशी दोन हात करीत आहेत. म्हणुनच घरात बसा, सुरक्षित रहा, शासकीय यंत्रणेला मदत करा.” असे आवाहन विकास शेवाळे यांनी केले आहे.