नाशिक - नवीन नाशिक परिसरातील संभाजी स्टेडियमजवळ एका तरुणाचा खुन झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी दोन संशयितांना अवघ्या दोन तासात अंबड पोलिसांनी अटक केली.
दोन तासात पोलिसांनी आवळल्या संशयितांच्या मुसक्या..
नाशिक शहरातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यातच आता भरदिवसा नाशिक शहरातील वर्दळीच्या ठिकाणी हत्या करण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल पोहोचली आहे. त्यामुळे नाशिक शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. शुक्रवारी अशीच एक धक्कादायक घटना नाशिकच्या अंबड परिसरातील संभाजीनगर स्टेडियम परिसरात घडली होती. संभाजी स्टेडियम परिसरात युवतीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या युवकाला हटकल्याने योगेश तांदळे याची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तर अवघ्या दोन तासात पोलिसांनी सापळा रचत याप्रकरणी दोन संशयितांना दोन तासात गजाआड केले.
गुन्हेगारीमुळे सर्वत्र भीतीच वातावरण
राहुल माळोदे आणि आदित्य सुतार असे अटक केलेल्या संशयितांची नावे असून या दोन्ही संशयित आरोपींना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तर पुढील तपास अंबड पोलीस करत आहेत. मात्र नाशिक शहरातील या वाढत्या गुन्हेगारीमुळे सर्वत्र भीतीच वातावरण पसरले असून पोलिसांनी ही गुन्हेगारी रोखण्यासाठी ठोस पावले उचलायला हवी, असे मत आता नाशिककरांकडून व्यक्त केले जात आहे.
हेही वाचा - 'तर गोव्याचे विमान राज्यपालांचेच असले असते, महाराष्ट्रातल्या प्रकारावर न बोललेलं बर'