नाशिक - सिनेसृष्टीमध्ये आम्ही फक्त 'रील हीरो' आहोत. मात्र, पोलीसच खरे हीरो आहेत. त्यामुळे मला नेहमीच पोलिसांचे कौतुक राहिले आहे, असे अभिनेता अक्षय कुमार म्हणाला. पोलिसांच्या आरोग्याविषयी माहिती देणारे मनगटी घड्याळ गोक्की या कंपनीने बनवले आहे. या घड्याळाशी संलग्न असलेल्या डॅशबोर्डचे ऑनलाइन पद्धतीने अभिनेता अक्षय कुमारच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्याने पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्याशी संवाद साधला.
आज सर्वांना माहित आहे कोरोनाविरोधात फ्रंटलाइनवर पोलीस होते. अज्ञात व अदृश्य शत्रूविरोधात त्यांना लढावे लागते आहे. अशावेळी त्यांची मानसिकता आणि शारीरिक क्षमता टिकून राहणे खूप गरजेचे होते. अशावेळी पोलिसांना त्यांच्या आरोग्याची किमान माहिती मिळू शकेल, असे डिव्हाईस या घड्याळात आहे. त्यामुळे सतर्कता बाळगणे शक्य झाले आहे, असेही अक्षय म्हणाला. तसेच पोलिसांसह नाशिककरांनो काळजी घ्या, सुरक्षित राहा, असे आवाहनही त्याने केले.
घड्याळामुळे पोलिसांच्या आरोग्याची निगा राखणे सोपे - नांगरे पाटील
कोरोना विरोधात डॉक्टरसोबत फ्रंटलाइनवर पोलीस ही होते. अज्ञात व अदृश्य शत्रूविरोधात त्यांना लढावे लागत आहे. अशावेळी त्यांची मानसिकता आणि शारीरिक क्षमता टिकून राहणे खूप गरजेचे आहे. या काळात त्याच्यांसाठी सकारात्मक मानसिकता आणि शारीरिक सुदृढताही तितकीची महत्त्वाची आहे. मात्र, हा लढा देत असताना प्रत्येकाच्या आरोग्याची सुरक्षितताही गरजेची होती. त्यासाठीच गुक्वीच्या मनगटी घड्याळामुळे पोलिसांना त्यांच्या आरोग्याची क्षमता वा निगा राखणे सोपे झाले, असे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील म्हणाले. तसेच त्यांनी गोक्कीचे सीईओ विशाल गोंडल आणि अभिनेता अक्षय कुमारचे आभार मानले.
गोक्वीच्या मनगटी घड्याळ्याच्या माध्यमातून प्रत्येक पोलिसांची आरोग्याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळते. त्यामुळे कोणाला ताप असेल, रक्तदाब आणि हृदयाचे पल्स कमी-जास्त झाले, तर तत्काळ त्या अधिकारी-कर्मचाऱ्यास डॉक्टरांकडे पाठविले जाते. त्यामुळे पहिल्या तीन लॉकडाऊनमध्ये एकही शहर पोलीस कर्मचाऱ्यास कोरोनाची लागण झाली नाही. अनलॉक झाल्यानंतर फक्त एकच पोलीस कर्मचारी बाधित झाला. मोटिव्हेशन आणि आहार-व्यायामामुळे शक्य झाले, असल्याचेही नांगरे पाटील म्हणाले. तसेच यावेळी नाशिक पोलीस आयुक्तालयातील साडेतीन हजार पोलीस कर्मचाऱ्यांना हे घड्याळ बांधण्यात आले.